खेड : आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास आपद्ग्रस्तांसाठी निवाऱ्याची व्यवस्था आणि मदतकार्य वेगाने व्हावे, असा निर्णय नगर परिषदेच्या आपत्ती व्यवस्थापन बैठकीत घेण्यात आला. याबाबत जनजागृती करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.
मुख्याधिकारी महादेव रोडगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला उपविभागीय अभियंता लघु पाटबंधारे सत्यजीत गोसावी, कृषी विभागाचे रवींद्र माळी, आगार व्यवस्थापक रणजीत राजेशिर्के, सहायक गटविकास अधिकारी करपे, महावितरणचे सहायक अभियंता वैभव मोडक, सतीश चिकणे उपस्थित होते.
मुख्याधिकारी रोडगे यांनी आपत्तीजन्य स्थितीत नागरिकांची सुरक्षितता, मदतकार्य आणि सूचना प्रणाली यासंदर्भात माहिती दिली. नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करून विविध निवारा केंद्रांमध्ये ठेवण्याची तयारी करण्यात आली आहे. मुकादम हायस्कूल, कासारआळी अॅक्टिव्हिटी सेंटर याठिकाणी निवाऱ्याची व्यवस्था केली आहे. जड्याळवाडी अंगणवाडीत मदत संकलन व वितरण केंद्र सुरू करण्यात येणार आहे.
शहरात नालेसफाई, खड्डे भरून काढण्याचे काम सुरू असून, पाणी योजनेंतर्गत सुरू असलेल्या खोदकामाच्या ठिकाणी पावसाळ्यात विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नातूवाडी धरणातून पाणी सोडल्याने पूर आला असा गैरसमज आहे. धरणातील प्रत्यक्षात पाणी साठवण्याचे काम १५ ऑगस्टनंतरच सुरू होते, अशी माहिती पाटबंधारे उपविभागीय अभियंता गोसावी यांनी दिली. आपत्तीमध्ये नुकसान झाल्यानंतर विमा कंपन्या शासकीय पंचनामे नाकारतात. यावरही यावेळी चर्चा झाली.
मुख्याधिकारी यांनी याबाबत संबंधित सरकारी यंत्रणेकडे पत्र पाठवणार असल्याचे सांगितले. तसेच, डेंग्यू प्रतिबंधक कार्यक्रम, गटारांची स्वच्छता, कॅफे कॉर्नर व महाडनाका येथे रस्त्यावर पाणी साचू नये, यासाठी उपाय, अशी विविध उपाययोजना आखण्यात आली आहे.
लोकांना अशा देणार सूचना
आपत्कालीन सूचना पोहोचवण्यासाठी घंटागाडी, व्हॉट्सअॅप, स्पीकरद्वारे प्रसारण आणि सार्वजनिक अलर्ट प्रणालीचा वापर करण्यात येईल. नगर परिषदेच्या ताफ्यात ३ यांत्रिकहोड्या, २ वल्ह्याच्या होड्या, लाइफ जॅकेट, टॉर्च, बोया, दोरी यांसारखे साहित्य सज्ज ठेवण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:39 PM 04/Jun/2025














