मंडणगड, दि. ०४ जून २०२५: मंडणगड तालुक्यातील पालघर गावठाण येथे झाडाचा पाला शेजारच्या जागेत पडल्याच्या किरकोळ कारणावरून एका कुटुंबाला तीन जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना २ जून २०२५ रोजी दुपारी १ वाजता घडली आहे. यात फिर्यादीसह त्यांची आई आणि लहान बहीण जखमी झाल्या आहेत. या प्रकरणी मंडणगड पोलीस ठाण्यात तिघांविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं?
ऋणाली रवींद्र सागवेकर (वय २०, रा. पालघर गावठाण, ता. मंडणगड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २ जून रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या वडिलांनी काटेरी झाड तोडले होते. त्या झाडाचा पाला शेजारी राहणाऱ्या आरोपी नरेश चंद्रकांत तपकिरे, शैलेश चंद्रकांत तपकिरे आणि एका अनोळखी महिलेच्या जागेत पडला.
यावरून चिडून आरोपी नरेश, शैलेश आणि त्या महिलेने ऋणालीच्या घरी जाऊन गोंधळ घातला. त्यांनी घरातील कांबेरू (लाकडी दांडा) आणि रॉडने ऋणाली, त्यांची आई रवीना सागवेकर आणि लहान बहीण ऋतिका सागवेकर यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी आरोपींनी ऋणालीच्या आईला हाताने मारहाण केली आणि त्यांच्या वडिलांनाही हाताने थापडा मारून शिवीगाळ केली. या मारहाणीत ऋणाली रवींद्र सागवेकर जखमी झाल्या आहेत.
गुन्हा दाखल, तपास सुरू
या घटनेनंतर ऋणाली रवींद्र सागवेकर यांनी मंडणगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार, दि. ०२ जून २०२५ रोजी रात्री १०:५६ वाजता आरोपी नरेश चंद्रकांत तपकिरे, शैलेश चंद्रकांत तपकिरे आणि एका अनोळखी महिलेविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम ११८(१), ३५२, ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंडणगड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे पालघर गावठाण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:43 04-06-2025














