पाली : ‘करिअर मार्गदर्शन म्हणजे विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडी, क्षमता आणि योग्यतेनुसार योग्य करिअर मार्ग निवडण्यास मदत करणे होय. हे मार्गदर्शन शिक्षण, प्रशिक्षण आणि व्यावसायिक संधींची माहिती देऊन व्यक्तिमत्त्व विकास साधून आणि योग्य निर्णय घेण्यास मदत करते. त्यामुळे करिअर मार्गदर्शन आवश्यक आहे’, असे प्रतिपादन डॉ. अभिजित खानविलकर यांनी केले.
मराठा संघ पालीच्या वतीने आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यासाठी व्यासपीठावर संघाचे अध्यक्ष मिलिंद सावंत, उपाध्यक्ष सुधीर सावंत, डॉ. अभिजित खानविलकर, विजय देसाई, राजेश कदम, सचिन सावंत उपस्थित होते. या वेळी विभागातील पाली, नाणीज या हायस्कूलच्या दहावी, बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा व राष्ट्रीय थ्रो बॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करून यश संपादन केलेल्या पाली पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांचा गुणगौरव या सोहळ्यात केला.
डॉ. खानविलकर म्हणाले, ‘विद्यार्थ्यांनी या शैक्षणिक जडणघडणीच्या महत्त्वाच्या टप्प्यात अन्य कोणत्याही व्यसनांच्या आहारी न जाता केवळ अभ्यास हेच व्यसन लावून घेऊन जर अभ्यास केला तर निश्चितच चांगले करिअर घडू शकते. विद्यार्थ्यांनी अभ्यास धर्म पाळला पाहिजे त्यासाठी १०० टक्के योगदान दिले तर यश हमखास मिळते. विद्यार्थ्यांनी विद्यार्थीदशेतच आपल्या करिअर निवडीची रूपरेषा निश्चित केली पाहिजे. त्यानुसार पुढील करिअर निवडीचा पर्याय निवडणे सोपे जाते. अनेकदा पदवीपेक्षा कर्तृत्वाने केलेले कामच मोलाचे ठरते.
या कार्यक्रमाला मराठा संघाचे सचिव राजेंद्र सावंत, अभिषेक साळवी, खजिनदार उमेश सावंत, गजेंद्र सावंत, संचालक चंद्रशेखर सुर्वे, सुधर्म सावंत, शैलेश काटकर, शशिकांत सावंत, मंदार भोसले आदी उपस्थित होते. मराठा संघातर्फे गतवर्षी वृक्षारोपण महिलांसाठी आरोग्य शिबिर, मोफत चष्मावाटप व नेत्र तपासणी असे सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहेत. प्रियदर्शनी रावराणे यांनी सूत्रसंचालन केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:00 PM 04/Jun/2025














