नाशिक : लाडकी बहीण योजनेमध्ये झालेला गोंधळ लक्षात घेऊन राज्याचे वित्तमंत्री अजित पवार यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी करून उबाठा शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले की, कुंभमेळ्याचे काम हे गुजरात मधील ठेकेदारांना देण्यात येणार आहे त्यामुळे फक्त पैशाची लूट करणे हेच कुंभमेळ्याचे लक्ष असल्याचे ते म्हणाले.
एका खाजगी कार्यक्रमासाठी सोमवार नाशिक दौऱ्यावर असलेल्या संजय राऊत म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी नुकतीच साधूसंतांसोबत नाशिकमध्ये कुंभमेळा बैठक घेतली. मात्र, शहराच्या विदारक अवस्थेकडे कुणाचेच लक्ष नाही. नाशिक शहरात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. रस्ते पाण्याने तुंबत आहेत.एकेकाळी नाशिकला दत्तक घेतल्याची भाषा करणार्या फडणवीसांनी आता शहराचे अनाथ आश्रम केले आहे, अशी घणाघाती टीका यावेळी त्यांनी केली. तसेच मुख्यमंत्र्यांनी गाडी काढावी प्रत्येक पक्षाचे दोन-दोन माजी नगरसेवकसोबत घेऊन एकदा शहरात फेरफटका मारावा आणि या शहराची अवस्था बघावी. मागील तीन वर्षात प्रशासकीय काळात या शहराची काय वाट लावली एकदा त्यांनी याची डोळा पहावे, असे आवाहनही यावेळी त्यांनी दिले.
पुढे ते म्हणाले की, “राज्यात लवकरच २७ महापालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता असून, गेली तीन वर्षे महापालिका निवडणुका झालेल्या नाहीत. प्रशासक नेमून महापालिका लुटल्या जात आहेत. ही कसली लोकशाही? लोकांना नगरसेवकच द्यायचे नाही. त्यांना प्राथमिक सुविधा होऊ द्यायच्या नाही, शेवटी न्यायालयाने खडेबोल सुनावल्यामुळेच आता तयारी सुरू झाली आहे”, असा खोचक टोलाही राऊतांनी लगावला.
लाडकी बहीण योजनेत सरसकट सर्वांना लाभ देणे चुकीचे होते, अशी कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज माध्यमांशी बोलतांना दिली होती. त्यावर बोलतांना राऊत म्हणाले की,”मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत लाडक्या भावांनी नावे बदलून या योजनेचा लाभ घेतला, अनेक सरकारी कर्मचाऱ्यांनी योजनेचा लाभ घेतल्याने या योजनेत मोठा अपहार झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी प्रायचीत्त म्हणून राजीनामा द्यावा, कारण हे पैसे अर्थखात्यातून गेले आहेत. राज्याच्या तिजोरीची लूट या योजनेच्या माध्यमातून करण्यात आली आहे. यामुळे अजित पवारांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी कोणत्या प्रश्नावर गांभीर्याने काम केले? टेंडर, ठेकेदारांकडून पैसे गोळा करणे आणि पैसे वाटणे हेच काम केले. अजित पवारही तेच करत आहेत. मुख्यमंत्रीही तेच करत आहेत. राज्याचे प्रश्न सोडवायचे कोणी, राज्याला प्रतिष्ठा प्राप्त करून द्यायचे कोणी? याबाबत त्यांच्याकडे काही नियोजन आहे असे वाटत नाही”,असेही संजय राऊत म्हणाले.
नाशिक कुंभमेळयासाठी सहा हजार कोटी रूपयांच्या निविदा काढण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. यावर बोलतांना खासदार राऊत म्हणाले की, कुंभमेळा हा सांस्कृतिक आहे. तो उत्तम प्रकारे व्हायला हवा परंतु , कुंभमेळयाच्या नावाखाली सरकार पैशांची कशी लुट होणार आहे हे तुम्ही पहायला हवे. प्रयागराजमध्ये सगळे ठेकेदार गुजरातमधून आले होते. नाशिकमध्ये यापेक्षा वेगळे होईल असे काही वाटत नाही. ५ ते १० हजार कोटी हे गुजरातच्या ठेकेदाराकडेच जाणार आहे. सगळे ठेकेदार गुजरातचेच ठरले आहे. कुंभमेळ्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करण्यात आला असला तरी प्रत्यक्ष किती कोटींचे काम होणार? आणि किती कोटी ठेकेदारांच्या खिशात जाणार? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:05 04-06-2025














