मंडणगड : “येणाऱ्या पिढ्यांच्या आणि पृथ्वीच्या सुरक्षित भविष्यासाठी पर्यावरणीय समतोल आणि भूजल स्त्रोतांचे बळकटीकरण अत्यंत महत्त्वाचे आहे” असे मत मंडणगड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री. विशाल जाधव यांनी व्यक्त केले. जल जीवन मिशन योजनेअंतर्गत ‘स्त्रोत बळकटीकरण आणि शाश्वतीकरण’ या दोन दिवसीय प्रशिक्षणाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
सदर प्रशिक्षण जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभाग आणि जेपीएस फाऊंडेशन लखनऊ यांच्या संयुक्त विद्यमाने मंडणगड येथील श्रीकृष्ण सभागृह येथे दि.०४ व ०५ जून रोजी आयोजित करण्यात आले आहे. याचा शुभारंभ आज मा. गटविकास अधिकारी यांच्या हस्ते पार पडला. याच वेळी पाण्याच्या तपासणीसाठी राज्य शासनातर्फे ग्रामपंचायतींना देण्यात येणाऱ्या क्षेत्रीय तपासणी संचांच्या (फील्ड टेस्टिंग किट) वितरणाचा देखील प्रातिनिधिक स्वरूपात शुभारंभ करण्यात आला. तसेच ‘जल जीवन मिशन’ योजना हस्तांतरीत झाल्याचे घोषित करणाऱ्या ग्रामपंचायतींच्या पदाधिकाऱ्यांचा प्रमाणपत्र आणि रोपे देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर गटविकास अधिकारी विशाल जाधव, श्रीमती कविता जवादे, उपअभियंता ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग मंडणगड, विस्तार अधिकारी राजेंद्र मोहीते, शाखा अभियंता कदम, पवन गोसावी, मुख्य संसाधन केंद्रांचे प्रतिनिधी अनिरुद्ध फळणीकर, सौ. अर्चना पाटील, शुभांगी देसाई आदी उपस्थित होते.
पाण्याच्या स्रोतांच्या शाश्वतीकरणाचे महत्त्व व्यक्त करतानाच पाण्याची नियमित तपासणी आणि गुणवत्ता नियंत्रण हे साथरोग प्रतिबंधासाठी महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन श्री. जाधव यांनी केले. विस्तार अधिकारी राजेंद्र मोहीते यांनी देखील आपली मनोगते व्यक्त केली आणि जिल्हा परिषदेच्या जल जीवन मिशन कक्षाच्या अधिकाऱ्यांचे कौतुक केले. प्रशिक्षण समन्वयक कमलेश जोशी यांनी प्रास्ताविक केले आणि आभार प्रदर्शन केले.
या प्रशिक्षणासाठी संबंधित ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्राम पाणी पुरवठा व स्वच्छता समितीचे सदस्य, अंगणवाडी सेविका, जलसुरक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:45 PM 04/Jun/2025














