Konkan Railway: कोकण रेल्वे मान्सूनसाठी सज्ज; ‘या’ तारखेपासून लागू होणार मान्सून वेळापत्रक

नवी मुंबई : कोकण रेल्वे काॅर्पोरेशनने मान्सूनपूर्व कामे पूर्ण केली असून, पावसाळ्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवल्या आहेत. सुरक्षित प्रवास, नियंत्रण आणि उत्तम दर्जाची प्रवासी सुविधा या तिन्ही आघाड्यांवर कोकण रेल्वे सज्ज झाली आहे.

विशेष म्हणजे पावसाळ्यात रेल्वे वाहतुकीवर कोणत्याही प्रकारचा परिणाम होणार नाही, यादृष्टीने बेलापूर, रत्नागिरी, मडगाव येथे नियंत्रण कक्षासह संवेदनशील ठिकाणी ३६५ कर्मचारी तैनात केले असल्याचे कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

कोकण रेल्वेचा सुमारे ७३८ किलोमीटरचा मार्ग डोंगराळ, जंगलवाटा आणि समुद्रकिनारी झपाट्याने बदलणाऱ्या हवामानातून जातो. त्यामुळे दर पावसाळ्यात रेल्वे प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहते; मात्र यंदा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विशेष उपाययोजना केल्याची माहिती घेण्यासाठी पत्रकार परिषदेत घेतली.

सहा ठिकाणी वैद्यकीय पथक कार्यरत

आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी कोकण रेल्वेने बेलापूर, रत्नागिरी आणि मडगाव येथील नियंत्रण कक्ष २४ बाय ७ कार्यरत ठेवले आहेत. तसेच चिपळूण, रत्नागिरी, वर्ना, मडगाव, कारवार आणि उडपी या ठिकाणी वैद्यकीय पथक सज्ज ठेवले आहे. विशेष म्हणजे हे मान्सून वेळापत्रक १५ जून ते २० ऑक्टोबर २०२५ या कालावधीत लागू राहणार आहे. या कालावधीत हवामानातील बदल लक्षात घेता, गाड्यांच्या गतीमध्ये विभागीय पातळीवर बदल केल्याचे झा यांनी सांगितले. याप्रसंगी कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी गिरीश करंदीकर हेसुद्धा उपस्थित होते.

विशेष उपाययोजना

भूस्खलनप्रवण भागांत संरक्षणात्मक कामे, मडगाव-रत्नागिरी मार्गावरील दरडप्रवण भागांत संरक्षक जाळ्या, स्लोप स्टॅबिलायझेशन, पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी ड्रेनेज कामे.
ड्रेनेज व पुलाखालच्या भागांची स्वच्छता पूर्ण. सुमारे १२०० ठिकाणी जलवाहिन्यांची व नाल्यांची स्वच्छता. पाण्याच्या निचऱ्यासाठी अतिरिक्त जलवाहिनी.
संभाव्य धोक्याच्या भागांत रेल्वे ट्रॅकवर रात्रंदिवस पेट्रोलिंग करणारे आणि वॉकी-टॉकी व आवश्यक साधनांनी सुसज्ज कर्मचारी तैनात.
प्रत्येक संवेदनशील स्टेशनवर जेसीबी, क्रेन, वैद्यकीय सुविधा व आपत्कालीन साहित्यासह बचाव पथक सज्ज.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:48 04-06-2025