तब्बल १७ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) यंदाच्या आयपीएल ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. या ऐतिहासिक विजयानंतर सोशल मीडियावर सर्वत्र विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील आरसीबी टीमची चर्चा सुरू आहे. विराट आणि अनुष्का शर्माचे अनेक भावनिक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत, ज्यातून किंग कोहलीच्या १७ वर्षांच्या संयमाचं विशेष कौतुक केलं जात आहे. या विजयाचा आनंद साजरा करत मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
बॉलीवूडमधून विकी कौशल, रणवीर सिंह, सुनील शेट्टी, विवेक ओबेरॉय यांसारख्या दिग्गजांनी विराटसाठी खास पोस्ट शेअर केल्या आहेत. यासोबतच, मराठी कलाविश्वातील कलाकारही आरसीबीच्या विजयाने भारावून गेले आहेत. पृथ्वीक प्रताप आणि क्षितीज पटवर्धन यांच्या पाठोपाठ मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री रुचिरा जाधव हिने विराट कोहली आणि आरसीबी टीमसाठी एक अत्यंत भावनिक पोस्ट लिहिली आहे.
‘बिग बॉस मराठी’चं चौथं पर्व आणि विविध मराठी मालिकांमधून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री रुचिरा जाधव ही विराट कोहलीची खूप मोठी चाहती आहे. ती प्रत्येक मॅचदरम्यान किंग कोहलीला पाठिंबा देत असते. आरसीबीने १७ वर्षांनी विजय मिळवल्याने अभिनेत्रीने खास पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
रुचिरा जाधवची विराट कोहलीसाठी भावनिक पोस्ट:
रुचिरा जाधवने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे, “हा खऱ्या अर्थाने जर्सी नंबर १८ चा विजय आहे… निष्ठा, समर्पण, उत्साह, संयमाचा विजय… १८ वर्षे एकही कप न जिंकता चाहत्यांच्या कायम मनात राहणं… दरवर्षी त्याच उत्साहाने टुर्नामेंटची सुरुवात करणं, तेवढ्याच आनंदाने मैदानावर पाऊल ठेवणं, लाखो चाहत्यांच्या शुभेच्छांचा भार खांद्यावर घेऊन सर्वोत्तम कामगिरी करणं… विराट खरंच तू किती भारी माणूस झाला आहेस…”
ती पुढे म्हणते, ““There is a one percent chance, and sometimes that chance is good enough” हे तुझे शब्द आम्हा चाहत्यांना कायम प्रेरणा देतात. आयुष्यात तू नेमका काय विचार करतोस याची जाणीव यादरम्यान आम्हा सर्वांना झाली. विराट तू खरंच सर्वांसाठीच प्रेरणादायी आहेस…”
शेवटी रुचिरा जाधव विराटच्या वैयक्तिक आयुष्यावरही भाष्य करते. ती म्हणते, “सर्वात महत्त्वाचं म्हणजे… तुझं अनुष्कावर असलेलं प्रेम… तू ज्याप्रकारे अनुष्कावर प्रेम करतो तो एक सुंदर आणि स्वतंत्र अध्याय आहे. मी फक्त एवढंच म्हणेन की, तू अमरेंद्र कोहली, विराट बाहुबली आहेस… आणि आता गेल्या काही दिवसांत अनुष्का आणि तुझं अध्यात्माशी वाढत जाणारं नातं पाहून… तुम्हा दोघांबद्दलचा आदर आणखी वाढला आहे. तू फक्त क्रिकेटपटू नाहीस… सर्वांसाठी इमोशन आहेस आणि खरोखरच प्रत्येकासाठी आदर्श आहेस. थँक्यू विराट कोहली…”
या विजयामुळे केवळ आरसीबीचे चाहतेच नव्हे, तर संपूर्ण क्रीडा आणि मनोरंजन विश्वात आनंदाची लहर पसरली आहे. विराट कोहलीचा १७ वर्षांचा संघर्ष आणि संयम अखेर फळाला आला असून, तो खऱ्या अर्थाने लाखो लोकांसाठी प्रेरणा ठरला आहे.














