रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यासाठी अभिमानाची बातमी आहे! येथील कृष्णाजी चिंतामण आगाशे शाळेचा कु. मल्हार अलंकार साळवी याने महाराष्ट्र ज्ञानपीठ सामान्य ज्ञान परीक्षा २०२४ मध्ये राज्यात प्रथम क्रमांक पटकावून जिल्ह्याचे नाव रोशन केले आहे. इयत्ता पहिलीमध्ये शिकणाऱ्या मल्हारने आपल्या हुशारीची आणि मेहनतीची चुणूक दाखवत हे उत्तुंग यश संपादन केले आहे.
नोव्हेंबर २०२४ मध्ये रत्नागिरी येथे झालेल्या या परीक्षेत मल्हारने आपल्या ज्ञानकौशल्याने सर्वांनाच प्रभावित केले. पहिलीच्या वर्गात असूनही त्याने सामान्य ज्ञानासारख्या विषयात मिळवलेले हे घवघवीत यश खरोखरच कौतुकास्पद आहे.
मल्हारच्या या दैदिप्यमान यशाबद्दल कृष्णाजी चिंतामण आगाशे शाळेत आनंदाचे वातावरण आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. कदम मॅडम, शाळा समितीचे प्रमुख श्री. हातखंबकर सर, वर्गशिक्षिका सौ. हातखंबकर मॅडम तसेच सर्व शिक्षक वर्गातर्फे मल्हारचे भरभरून अभिनंदन करण्यात आले. त्याच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
मल्हारच्या या यशाने इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. त्याच्या या कामगिरीमुळे कृष्णाजी चिंतामण आगाशे शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.














