रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील नेवरे गावामध्ये एका आंबा बागेतील शेतघराला शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागून सुमारे ३० लाख रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे. सोमवारी (दि. २ जून) मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली असून, शेतघरातील शेती उपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे.
आगीचा तपशील:
नेवरे येथील रफिक रज्जाक नाकाडे यांची आंबा बाग असून, त्यांनी बागेत चिरेबंदी शेतघर बांधले आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी त्यांनी आपले सर्व महत्त्वाचे शेती उपयोगी साहित्य या शेतघरामध्ये सुरक्षित ठेवले होते. यामध्ये शेतीपंप, ग्रास कटर, फवारणी पंप, फवारणीसाठी लागणारे स्प्रे, पाईप, जनरेटर, पॉवर टिलर, पाण्याच्या टाक्या, पाण्याचे पंप, चार हजार लाकडी खोक्याची कापलेली पट्टी, खोका पट्टी कापण्याचे मशीन, आंबा काढणीसाठी लागणारे झेले, क्रेट, विविध प्रकारची खते, कीटकनाशके आणि इतर अनेक अवजारे यांचा समावेश होता.
सोमवारी (दि. २ जून) मध्यरात्रीच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे अचानक या शेतघराला आग लागली. ही आग इतकी भीषण होती की, पहाटेच्या सुमारास रफिक यांचे बंधू नुरमहमद नाकाडे कामगारांसह बागेत गेले असता त्यांना धूर दिसला. ते शेतघरापर्यंत पोहोचले तोपर्यंत इमारत आणि त्यातील सर्व साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते. प्लास्टिक साहित्य जळत असल्याने मोठ्या प्रमाणावर धूर पसरला होता. आगीची तीव्रता इतकी होती की, शेतघरावरील पत्रे आणि लोखंडी खांब देखील वितळले होते.
मोठे नुकसान आणि प्रशासकीय कारवाई:
घटनेची माहिती मिळताच नाकाडे कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. सर्वांच्या मदतीने आग विझवण्यात आली, परंतु तोपर्यंत आतील सर्व साहित्य जळून केवळ राख आणि इमारतीच्या भिंती शिल्लक राहिल्या होत्या. या आगीत रफिक रज्जाक नाकाडे यांचे अंदाजे ३० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
या घटनेची माहिती महसूल विभाग, महावितरण आणि रत्नागिरी ग्रामीण पोलीस यंत्रणेला देण्यात आली आहे. संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून नुकसानीची नोंद घेतली आहे. या घटनेमुळे नाकाडे कुटुंबावर मोठे आर्थिक संकट आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:09 05-06-2025














