पावस परिसरातील ५० टक्के भातपेरण्या पूर्ण

पावस : पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे पेरणीची कामे थांबली होती; परंतु पावसाचा वेग मंदावल्यामुळे पावस परिसरातील शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामाला गती दिल्याने अनेक शेतकऱ्यांनी ५० टक्के पेरण्या पूर्ण केल्या आहेत. उर्वरित पेरण्यांची कामे वेगाने सुरू आहेत. लवकर पडलेल्या पावसामुळे पावस परिसरातील पाणीटंचाईचा प्रश्न सुटला आहे.

यंदा आंबा, काजूचे उत्पादन दरवर्षीच्या तुलनेमध्ये कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे; परंतु शेवटच्या टप्प्यात दर चांगला मिळाला होता. हंगामातील परिस्थिती नियंत्रणात येत असतानाच मेच्या दुसऱ्या पंधरवड्यात अचानक पावसाने हजेरी लावली आणि बागायतदारांच्या स्वप्नांवर पाणी फेरले गेले. परिणामी, शेवटच्या टप्प्यातील उत्पादनच बागायतदारांच्या हाती लागलेले
नाही. दहा दिवसांनंतर पाऊस थांबल्यामुळे शेतकऱ्यांनी भातपेरणीला सुरुवात केली.

कृषी विभागाकडून भातपेरण्या विलंबाने करा, अशी सूचना दिली होती; परंतु जूनच्या सुरुवातीला अधूनमधून सरी पडत असल्याने त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला आहे. पावस परिसरातील सुमारे ५० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.

यंदा रोहिणी नक्षत्रामध्येच मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांची तारांबळ उडाली होती; परंतु आता पावसाचा जोर कमी झाल्याने पेरणी व नांगरणीच्या कामाला आरंभ झाला आहे. हे वातावरण पुढे कायम राहिल्यास रोपांची उगवण चांगल्याप्रकारे होईल आणि लवकरच लावणीची कामे सुरू होतील – नीलेश ठीक, शेतकरी, पावस

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:41 AM 05/Jun/2025