‘फेक न्यूज’चा प्रसार थांबवणे शक्य : सतीश लळीत

रत्नागिरी : फेक न्यूज हे आव्हान आहे. त्याचा उगमस्थान शोधणं जरी कठीण असले तरी त्याचा प्रसार थांबवणे शक्य आहे. प्रसार जर थांबवला तर त्यावर बंधन आणू शकतो, असे मार्गदर्शन माजी माहिती उपसंचालक सतीश लळीत यांनी केले.

विभागीय कोकण माहिती कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय रत्नागिरी यांच्यावतीने घेण्यात आलेल्या कोकण विभागातील पत्रकारांसाठी दोनदिवसीय कार्यशाळेत ‘फेक न्यूज, एआय तंत्रज्ञान, समाजमाध्यम हाताळणी’ या विषयावर ते मार्गदर्शन करत होते. या वेळी माहिती संचालक हेमराज बागुल उपस्थित होते. संगणकीय सादरीकरण करून लळीत यांनी अतिशय सविस्तरपणे विषयांची मांडणी केली. ते म्हणाले, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या म्हणण्यानुसार, भारताचा फेक न्यूजमध्ये प्रथम क्रमांक आहे. असत्य, दिशाभूल करणारी माहिती म्हणजे फेक न्यूज होय. विनोद, उपरोध, व्यंग म्हणून केलेला फोटो फेक स्वरूपात वायरल होतो.

क्लिक बेट किंवा आमिष, आर्थिक फसवणुकीच्या उद्देशाने फेक न्यूज पसरवली जाते. खोडसाळपणा, चुकीचा मेसेज देण्यासाठी, राजकीय सुडापोटी, निंदानालस्ती करण्यासाठी बातमी खरी; परंतु संदर्भ खोटा अशा प्रकारेही फेक न्यूज पसरत असते. फेकन्यूज थांबवायची असेल तर त्याचे उगमस्थान शोधा आणि तपासा. शीर्षकापलिकडे पाहा. लेखक कोण ते तपासा. अन्य सूत्रांचा आधार घ्या. प्रसिद्धीची तारीख पाहा. कोणी गंमत तर करत नाही ना, हे तपासा. स्वतःचे पूर्वग्रह तपासा. त्याबाबत जाणकारांना विचारा. फेक न्यूज हे आव्हान आहे. त्याबाबत शहानिशा केली पाहिजे. माहिती तंत्रज्ञान कायद्यात शिक्षा, दंड याची तरतूद आहे. या प्रसंगी समीर कर्वे म्हणाले, शत्रू कोणत्या रूपात समोर येईल सांगता येणार नाही.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:14 AM 05/Jun/2025