रत्नागिरी : जिल्ह्यातील राष्ट्रीय, राज्य, अंतर्गत जिल्हामार्गावर वाहतुकीचे नियम मोडून वाहन चालवणाऱ्या ६ हजार १५२ वाहनांवर वर्षभरात कारवाई केली असून, त्यांच्याकडून २ कोटी ६० लाख ७३ हजार रु. चा दंड व ७७ लाख ३६ हजार कर वसूल केला आहे. सर्वाधिक दंडवसुली मालवाहू ट्रक, टिप्पर, ट्रेलर या वाहनांकडून केले असून, ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या ३९५ ट्रकना १ कोटी ११ लाख रु. चा दंड केला, तर जिल्ह्यात मुदत संपलेल्या ९०० वाहनांवर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून कारवाई केली आहे.
वाहतुकीचे नियम मोडून वाहनचालकांसह अवैध वाहतूक, ओव्हरलोड वाहतूक, विनाहॅल्मेट, परवाना नसणे, मुदतबाह्य वाहने, पीयुसी नसताना वाहन चालवणे अशा वाहनचालकांवर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून कारवाई केली जाते.
सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात एकूण ६ हजार १५२ वाहनचालकांवर कारवाई करून २ कोटी ६० लाखांचा दंड करण्यात आला. अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या तसेच वाहतुकीचे नियमभंग करणाऱ्या ३१७ प्रवासी बस, रिक्षाचालक यांना ३० लाखाचा दंड करण्यात आला. विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या ४९ स्कूलबसवरही कारवाई केली आहे. विनाहॅल्मेट १ हजार ७५१ वाहनचालकांसह विना सीटबेल्ट १८६ वाहने, ओव्हरस्पीड ११७३ वाहने, ट्रिपल सीट १९७ वाहने, गाडी चालवताना मोबाईलचा वापर ३६८ चालक, विनाविमा प्रमाणपत्र ८७२, परवानगीशिवाय वाहनांमध्ये बदल २० वाहने, रिफ्लेक्टरशिवाय ५०० वाहने, लायसन नसणे ३२६, मुदतबाह्य वाहने ९००, पीयुसी नसताना वाहन चालवणे ७३२ यांच्यावर कारवाई केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
1:01 PM 05/Jun/2025









