रत्नागिरी : केंद्र व राज्य शासनाच्या कृषी योजनांचा लाभ थेट शेतकऱ्यांना मिळावा यासाठी शेतकरी ओळख क्रमांक अर्थात फार्मर आयडी बंधनकारक करण्यात आले आहे. जिल्ह्यात एकूण ४ लाख ८७ हजार ९३६ इतके खातेदार असून आतापर्यंत २ लाख १८ हजार १४३ शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढलेली आहे. यामध्ये सर्वाधिक चिपळूण, संगमेश्वर, गुहागर तालुक्याने आघाडी घेतली आहे. तर मंडणगड पिछाडीवर आहे. अद्याप २ लाख ६९ हजार ७९३ खातेदारांनी अद्याप आयडी काढलेली नाही. ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढली नाही. त्या शेतकऱ्यांना शासनाच्या कृषीसह इतर योजनांचा लाभ मिळणार नाही.
शेतकरी ओळख तयार करण्यासाठी शासनाचा हा महत्वकांक्षी उपक्रम आहे. शेतकऱ्यांना विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी शेतकऱ्याला वारंवार प्रमाणिकरणांची आवश्यकता राहणार नाही.
अॅग्रीस्टॅक योजनेंतर्गत शेतकऱ्याने आपला सातबारा आधार लिंक करायचा आहे. जेणेकरून तुम्हाला एक फार्मर आयडी मिळेल. ओळखपत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री कृषी योजना, एकात्मिक फलोत्पादन, फळबाग लागवड योजना, खरीप पीक योजना, फळपीक विमा योजना, नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पिकांची नुकसानभरपाई ओळखपत्रामुळे मिळते. दरम्यान, ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नाही त्यांना पीक विमा, पीक कर्ज, पीएम किसान व पीक अनुदान यांचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढावी, अन्यथा कृषीसह इतर योजनेच्या लाभास मुकावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महसूल, ग्रामविकास आणि कृषी विभाग यांच्याकडून रत्नागिरी जिल्ह्यात अॅग्रीस्टॅक नोंदणीचे कामकाज सुरू आहे. लाभार्थी, खातेदारांची उपस्थिती नसणे, खातेदार बाहेरगावी असल्याने प्रतिसाद कमी मिळत आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढली नाही. कृषी इतर योजनांचा लाभ घेण्यासाठी तसेच नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई, पिक विमा आणि पीएम किसानचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी बंधनकारक आहे. – शिवकुमार सदाफुले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, रत्नागिरी.
फार्मर आयडी असते तरी काय
शेतकऱ्यांचे ओळखपत्र म्हणजेच फार्मर आयडी. ही एक डिजिटल ओळख आहे. जी शेतकऱ्यांचे आधार कार्ड त्याच्या जमिनीच्या नोंदीशी म्हणजेच जमिनीच्या तपशिलांशी जोडते. सरकारच्या डिजिटल कृषी अभियानाचा महत्त्वपूर्ण भाग आहे. हे आयडी असल्या कृषीसह इतर योजनांचा लाभ मिळण्यास कोणतीही अडचण येत नाही.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:40 PM 05/Jun/2025














