देवरूख : देवरूख-मार्लेश्वर रस्त्यावर मारळ गावाजवळ एक भला मोठा खड्डा पडला आहे, जो मार्लेश्वरकडे जाणाऱ्या भाविक आणि पर्यटकांसाठी अपघाताचा धोका निर्माण करत आहे. या खड्यामुळे अनेक अपघात घडण्याची शक्यता असल्याने तो लवकरात लवकर बुजवावा, अशी मागणी मार्लेश्वर देवस्थानचे भक्त आणि पर्यटकांकडून सातत्याने केली जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि मार्लेश्वर देवस्थान ट्रस्टने या गंभीर प्रश्नाकडे लक्ष द्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
सह्याद्रीच्या कुशीत वसलेले मारळ गाव हे प्रसिद्ध श्री क्षेत्र मार्लेश्वर देवस्थानमुळे ओळखले जाते. येथे लाखो भाविक दर्शनासाठी येतात, तसेच निसर्गाचे सौंदर्य अनुभवण्यासाठी पर्यटकही मोठ्या संख्येने गर्दी करतात. चार महिन्यांपूर्वीच मारळ ते मार्लेश्वर रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते.
मागील जानेवारी महिन्यात मकरसंक्रांतीनिमित्त मार्लेश्वर येथे श्री देव मार्लेश्वर आणि साखरपा येथील गिरीजा देवी यांचा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यात्रेच्या अवघ्या दोन दिवस आधी, ठेकेदाराने घाईघाईने मारळ येथील मोरीवरील अपूर्ण कामावर डांबरीकरणाचा थर दिला. त्यावेळीही रस्त्यावर वाहनांची वर्दळ सुरू होती आणि ती थांबवणे शक्य नव्हते. वास्तविक पाहता, हे काम खूप आधीच पूर्ण करायला हवे होते. या बेजबाबदार कामाचा परिणाम म्हणून आता मोरीवरील डांबरीकरण वाहून गेले असून, पुन्हा एकदा खड्डयांनी रस्ता व्यापला आहे. खड्डयांमध्ये पाणी साचल्याने वाहनचालकांना त्यांची खोली कळत नाही, ज्यामुळे अपघात होण्याचा धोका वाढतो. दोन दिवसांपूर्वीच याच खड्ड्यात एक दुचाकी घसरली होती, सुदैवाने मोठी हानी टळली.
पावसाळ्याच्या दिवसांत उंच डोंगरांवरून कोसळणारे धबधबे, घनदाट झाडी, खळाळणाऱ्या नद्या आणि सुखद गारवा अनुभवण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने या मार्गावरून प्रवास करत आहेत. अशावेळी मारळ येथील हा खड्डा त्यांच्या प्रवासात अडथळा ठरत आहे. यावर तात्काळ आणि परिणामकारक उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. संबंधित ठेकेदार, मारळ ग्रामपंचायत, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि देवस्थान ट्रस्ट यांनी या समस्येवर त्वरित लक्ष देऊन प्रवाशांना सुरक्षित प्रवास सुनिश्चित करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:46 AM 05/Jun/2025














