चिपळूण नगर पालिका करणार १ हजार २०० वृक्षांची लागवड

चिपळूण : येथील नगर पालिकेमार्फत शहरातील विविध भागात १ हजार २०० वृक्षांची लागवड केली जाणार आहे. त्यासाठी वृक्ष रोपेही उपलब्ध करण्यात आले आहेत. या लागवडीचा शुभारंभ जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून दि. ५ जून रोजी करण्यात येणार आहे.

दरवर्षी वृक्ष लागवडीसाठीचा उपक्रम राबविला जात असून गेल्या तीन वर्षात लावलेल्या ४ हजार वृक्षांपैकी ३ हजार वृक्ष जगली आहेत. यासाठी कर्मचाऱ्यांची मेहनत कामी आली आहे. चिपळूण नगर पालिकेने वृक्ष लागवडीची चळवळ उभी केली आहे. या उपक्रमाला शहरातूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

सर्वत्र होणारी वृक्षतोड, त्याबदल्यात न होणारी लागवड याचा परिणाम वातावरणावर होत आहे. परिणामी, दरवर्षी उष्प्यात मोठी वाढ होताना दिसत आहे. यावर्षी तर उष्म्याने अधिकच हैराण केले होते. बदलणाऱ्या पर्यावरणाला पूर्वपदावर आणण्यासाठी पावसाळ्यात जास्तीत जास्त वृक्ष लागवड करण्याच्या सूचना शासनस्तरावरून केल्या जात आहेत. दरवर्षी नगर परिषदेच्या उद्यान विभागाच्या माध्यमातून जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वृक्ष लावली जातात. यावर्षी १ हजार २०० वृक्ष लावण्याचा संकल्प मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी केला आहे. तशा सूचना त्यांनी उद्यान विभागाला दिल्या आहेत. उद्यान विभागाचे प्रमुख प्रसाद उर्फ बापू साडविलकर यांनी ताम्हण, बांबू, फणस, आंबा, चिंच, काजू आदी प्रकारची वृक्ष रोपे येथे उपलब्ध केली आहेत.

या लागवडीचा शुभारंभ ५ जून रोजी केला जाणार आहे. यासाठी नव्या जागा शोधण्यात आल्या आहेत. पूर्वी लावलेली व न जगलेली वृक्ष शोधण्यात आली आहेत. त्या जागीही नव्याने लागवड केली जाणार आहे. गेल्या तीन वर्षात येथे लावलेल्या ४ हजार वृक्षांपैकी ३ हजार वृक्ष जगली आहेत. यासाठी उद्यान विभागात काम करणारे कर्मचारी उद्यान विभागाचे प्रमुख श्री. साडविलकर यांनी ठरवून दिलेल्या वेळेनुसार झाडांची देखभाल करीत आहेत. त्यामुळे यांची मेहनत कामी आली आहे, असे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:09 PM 05/Jun/2025