Congress Vijay Wadettiwar: कुर्ला येथील २१ एकर जागा ही अदानी उद्योग समूहाला राज्य सरकारने देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी अटी शर्ती शिथिल केल्या आहेत. संपूर्ण मुंबईतील अनेक महत्त्वाचे भूखंड हे या समूहाला देण्यात आले आहेत.
अजून किती जमीन यांना देणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. महाराष्ट्र आणि मुंबईचे अदानी समूहाला गहाण ठेवली आहे का? असा संतप्त सवाल काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.
पत्रकार परिषदेत बोलताना विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर टीका केली. मुंबईतील धारावी प्रकल्पासाठी अदानी समूहाला मुंबईतील जमिनीची खैरात वाटण्यात येत आहे. धारावी पुनर्वसनाचे नाव पुढे करून मोक्याच्या जागा या उद्योग समूहाला देण्याचे काम सरकार करत आहे. या मोक्याच्या ठिकाणी टॉवर उभे केले जाणार पण धारावीकरांसाठी जमीन दिल्याचे सरकार सांगत आहे हे खोट आहे, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला. हे सरकार अदानी उद्योग समूहासाठी महाराष्ट्राला उद्ध्वस्त करत असल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली.
२०२९ निवडणुकीला समोर ठेवून जुमलेबाजी सरकारने करू नये
देशात जनगणना होणार आहे , २०२७ पासून या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. यावेळी जातीनिहाय जनगणना देखील करण्यात येणार आहे. विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांनी जातीनिहाय जनगणनेची मागणी लावून धरली होती, त्यानंतर सरकारने निर्णय घेतला आहे. आता सरकारने २०२७ मध्ये जनगणनेची प्रक्रिया सुरू करणार ही घोषणा केली आहे. निवडणुकीत ओबीसी समाजाची मत घ्यायची पण त्यांच्याकडे भाजपा दुर्लक्ष करते. आता २०२९ निवडणुकीला समोर ठेवून जुमलेबाजी सरकारने करू नये. जातीनिहाय जनगणना करायची असेल तर सरकारने याचवर्षी ती प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
दरम्यान, राज्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यात बोगस बियाणामुळे शेतकऱ्यांना अजून फटका बसेल याकडे लक्ष देण्याची सरकारची जबाबदारी आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:58 05-06-2025














