रत्नागिरी : बागायती उत्पादन वाढीसाठी मधुमक्षिका पालन पोषक

रत्नागिरी : जिल्ह्याच्या आर्थिक उत्पन्नात भर टाकणारी आंबा, काजू ही दोन मुख्य पिके आहेत. परंतु, हवामानातील बदलामुळे पिकाची उत्पादकता धोक्यात आली आहे. दरवर्षी खत व्यवस्थापनापासून आंबा बाजारात येईपर्यंत होणारा खर्चही निघत नसल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. प्रत्येक शेतकरी अभ्यास करून विविध उपाययोजना करीत आहेत. रत्नागिरीत तालुक्यातील अशाच काही अभ्यासू शेतकऱ्यांनी एकत्र येत ‘फुलोरा’ शेतकरी गट तयार केला आहे. त्यांनी बागायतीमध्ये मधुमक्षिका पालन व्यवसाय सुरू केला असून, त्याचा त्यांना फायदा झाला आहे.

आत्मा, कृषी विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली आंबा, चिकू, काजू, नारळ, सुपारी उत्पादन घेणारे ३५ शेतकऱ्यांनी एकत्र येत ‘फुलोरा’ मधमाशीपालक संघ स्थापन केला. गेल्या आठ वर्षांत या संघातील प्रत्येक शेतकऱ्यांना त्यांच्या बागेतील उत्पन्नात वाढ झाली असल्याचे निदर्शनास आले आहे. मधाच्या व्यवसायासह बागायती उत्पन्नात भर पडली हे मात्र विशेषच.

परागीकरणाचा परिणाम
रासायनिक कीड, कीटकनाशके यांच्या अनिर्बंध वापरामुळे परागीकरण घडवून आणणारे मध्यस्थी कीटकच नष्ट झाल्याने फलधारणेवर त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे परागीभवनाशिवाय वाढणारी फळे कालांतराने गळून जातात. हे लक्षात आल्याने ‘फुलोरा’च्या माध्यमातून शेतक-यांनी एकत्र येत आपापल्या बागेत स्वतंत्र मधुमक्षिका पालन व्यवसाय सुरू केला आहे. मध गोळा करणे यापेक्षा बागायतीचे उत्पन्न वाढविणे हाच असल्यामुळे गेल्या आठ वर्षांत सकारात्मक बदल दिसत आहेत.

कमी भांडवलात व्यवसाय
अतिशय कमी भांडवलामध्ये सहज करण्याजोगा हा व्यवसाय असल्याचे ‘फुलोरा’ गटातील शेतकऱ्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी याबाबत आवश्यक प्रशिक्षणही घेतले आहे. एकमेकांना येणारे अनुभवसुद्धा विषद करीत असल्यामुळे त्यांना त्याचा फायदा झाला आहे. त्यांच्या या अनुभवामुळे परिसरात नव्याने मधुमक्षिका पालन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. मधमाश्यांची वसाहत राखताना अनेक अडचणी येत असल्याने जिल्ह्यात मधमाशी संगोपन व संवर्धन याविषयी प्रशिक्षण सुरू होणे आवश्यक आहे. हवामानातील बदलामुळे रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करावी लागते. मात्र, कीटकनाशकाच्या फवारणीवेळी मधमाश्यांच्या वसाहती स्थलांतरित कराव्या लागतात, त्या स्थलांतरित न करता, वसाहतींचे नुकसान होणार नाही, यासाठीच्या उपाययोजना शेतकरी करीत आहेत.

स्वतंत्र व्यवसाय
‘फुलोरा’ गटातील शेतकऱ्यांचा स्वतंत्र व्यवसाय असला तरी त्यांनी परागीकरण वाढण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा त्यांना फायदा झाला आहे. मधाचे उत्पादन व व्यवसाय हा दुय्यम भाग, परंतु बागायतीचे उत्पादन वाढविणे हा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांचा स्वतंत्र व्यवसाय असला तरी बागायतीमधील पूरक व्यवसाय फायदेशीर ठरला आहे.

तालुक्यातील अभ्यासू शेतकऱ्यांनी एकत्र येत ‘फुलोरा’ बचतगटाची स्थापना केली. आवश्यक प्रशिक्षण, माहिती, तंत्र अवगत करून मधुमक्षिका व्यवसाय सुरू केला. गेल्या आठ वर्षात त्यांच्या बागायतीच्या उत्पादनात सकारात्मक बदल निदर्शनास आले आहेत- विनोद हेगडे, तालुका कृषी अधिकारी, रत्नागिरी

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:13 PM 05/Jun/2025