रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या शिर्के हायस्कूलच्या रस्त्याचे काम नवलाई ग्रुपने यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. ज्या शाळेत नवलाई ग्रुपच्या संचालकांच्या तीन पिढ्यांनी शिक्षण घेतले, त्याच शाळेला एक सुंदर आणि सुव्यवस्थित रस्ता बांधून देण्याचे काम या ग्रुपने ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर पूर्णत्वास नेले आहे.
कोकणातील बांधकाम क्षेत्रातील एक अग्रगण्य ग्रुप म्हणून नवलाई ग्रुपची ओळख आहे. व्यावसायिक प्रकल्प यशस्वीपणे हाताळण्यासोबतच, सामाजिक बांधिलकी जपत काही वेगळे प्रकल्पही हा ग्रुप पूर्ण करत असतो. याच परंपरेचा भाग म्हणून शिर्के हायस्कूलच्या रस्त्याचे काम हाती घेण्यात आले. नवलाई ग्रुपच्या संचालकांच्या भावना शाळेप्रति असलेल्या ऋणानुबंधामुळे, त्यांनी हे काम प्राधान्याने घेतले.
या प्रकल्पासाठी नवलाई ग्रुपला रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे विजय साखळकर यांचे उत्तम सहकार्य लाभले. “हे काम आम्ही केवळ व्यवसाय म्हणून केले नाही, तर शाळेप्रति आमच्या भावना व्यक्त करण्यासाठी केले आहे,” अशा शब्दांत नवलाई ग्रुपच्या संचालकांनी आपली भावना व्यक्त केली. या कामामुळे शाळेच्या विद्यार्थ्यांना आणि कर्मचाऱ्यांना आता सुलभ आणि सुरक्षित रस्त्याचा लाभ मिळणार आहे.













