मंडणगडमध्ये क्षुल्लक वादातून मारामारी; एकाला दुखापत

मंडणगड : पालघर गावठाण, ता. मंडणगड येथे दि. २ जून २०२५ रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास एका क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादानंतर मारामारीचा प्रकार घडला. यात एका व्यक्तीला दुखापत झाली आहे. या प्रकरणी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम ११८(१), ३५२, ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेच्या शेजारी राहणारा आरोपी रवींद्र भिकू सागवेकर याने आपल्या जागेतील झाडाचा पाला फिर्यादीच्या जागेत टाकला होता. याच गोष्टीची माहिती फिर्यादीचा मुलगा नरेश तपकिरे याने आईला दिली. हा प्रकार ऐकून आरोपी रवींद्र सागवेकर याने शिवीगाळ करत, “मी कुठे पाला टाकलाय?” असे बोलण्यास सुरुवात केली.

या वादानंतर आरोपी रवींद्र सागवेकर आणि त्याच्यासोबत असलेल्या तीन महिला (एकूण चार आरोपी) यांनी फिर्यादी व साक्षीदारांना दगड आणि काठीने मारहाण केली. या मारहाणीत फिर्यादीचा मुलगा नरेश तपकिरे यांच्या उजव्या पायाला दगड लागून दुखापत झाली, तसेच त्यांच्या दोन्ही हातांना आणि डाव्या मांडीवरही मार लागला.

या घटनेनंतर जखमी नरेश चंद्रकांत तपकिरे यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी मंडणगड पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:59 05-06-2025