दारू पिण्यास मनाई केल्याने पतीने केली पत्नीला कोयत्याने मारहाण!

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील तिवरे मेढे, साखरपा येथे दिनांक ३ जून २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास पतीने दारू पिण्यास मनाई केल्याच्या रागातून आपल्या पत्नीला लोखंडी कोयत्याने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी देवरुख पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आपल्या घरी काम करत असताना, त्यांचे पती जयेश शांताराम नार्वेकर (वय २६) हे नेहमीप्रमाणे दारू पिऊन घरी आले. त्यावेळी फिर्यादीने त्यांना दारू न पिण्याबाबत समजावून सांगितले. यावर जयेश नार्वेकर संतापले आणि “तू मला काही सांगू नकोस, माझे मी बघतो,” असे बोलून त्यांनी पत्नीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

या शाब्दिक वादानंतर जयेश नार्वेकर यांनी घरातील जेवणाच्या खोलीतून जुना एक लोखंडी कोयता घेतला आणि रागाच्या भरात फिर्यादी महिलेच्या डोक्यात मारून त्यांना गंभीर दुखापत केली.

या घटनेनंतर फिर्यादी महिलेला उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, या गुन्ह्याची नोंद रत्नागिरी शहर पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं. ००/२०२५ अन्वये देखील झाली आहे. देवरुख पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:01 05-06-2025