चिपळूणमध्ये मानसिक छळाला कंटाळून व्यक्तीची आत्महत्या; आठ जणांविरोधात गुन्हा दाखल

चिपळूण, रत्नागिरी: चिपळूण तालुक्यातील मार्कंडी येथील साईदर्शन अपार्टमेंटमध्ये मानसिक छळ आणि सततच्या धमक्यांना कंटाळून अमरनाथ वामनराव कोवळे (वय ५९) यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी तब्बल आठ जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आणि धमकावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १ फेब्रुवारी २०२० ते ४ जानेवारी २०२२ या कालावधीत घडली असून, यावर ४ जून २०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत अमरनाथ कोवळे यांच्या सुनेची (आरोपी क्र. १) वागणूक लग्नानंतर (१ फेब्रुवारी २०२०) बदलली होती. ती घरात व्यवस्थित वागत नव्हती आणि मृत अमरनाथ यांचा अपमान करत असे. तिला अनेक वेळा समजावण्याचा प्रयत्न केला असता, तिच्या वागण्यात कोणताही बदल झाला नाही.

आरोपी सुनेने फिर्यादी, मृत अमरनाथ आणि त्यांच्या मुलाला मानसिक त्रास दिला. तसेच, ‘स्वतःचे जीवाचे नुकसान करून तुमच्यावर त्याचे खापर फोडेन,’ अशी धमकी देऊन त्यांच्यावर दबाव निर्माण केला होता. जेव्हा याबद्दल आरोपी सुनेच्या माहेरच्या नातेवाईकांना (आरोपी क्र. २ ते ८) सांगण्यात आले, तेव्हा त्यांनीही फिर्यादी आणि त्यांच्या कुटुंबीयांना उलटसुलट उत्तरे दिली.

आरोपी हे मृत अमरनाथ यांचे म्हणणे टाळत होते आणि त्यांच्याशी अपमानास्पद, अर्वाच्च व अश्लील भाषेत बोलत होते. आरोपींनी केलेल्या मानसिक छळ, अपमानास्पद वागणूक आणि खोट्या गुन्ह्यात अडकवण्याच्या धमक्यांना कंटाळून अमरनाथ वामनराव कोवळे यांनी आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान संहिता कलम ३०६ (आत्महत्येस प्रवृत्त करणे), ५०६ (धमकावणे), ३४ (सामूहिक कृती) प्रमाणे गुन्हा रजि. नं. १२६/२०२५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याला उशीर होण्याचे कारण चिपळूण पोलीस ठाण्यात आमू रजि. नं. ०१/२०२२ नुसार झालेल्या चौकशी अंती हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास चिपळूण पोलीस करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:05 05-06-2025