राजापूरजवळ ८९ वर्षीय वृद्ध महिलेचा मृतदेह खड्ड्यात आढळला; तीन दिवसांपासून होत्या बेपत्ता

राजापूर : राजापूर तालुक्यातील नाटे पडवणेवाडी येथील मुरकुंडा येथे शशिकला कृष्णा आंबोळकर (वय ८९) या वृद्ध महिलेचा मृतदेह बुधवारी (४ जून २०२५) सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास एका मोकळ्या जागेतील लहान खड्ड्यात आढळून आला. शशिकला आंबोळकर या १ जून २०२५ पासून बेपत्ता होत्या.

मिळालेल्या माहितीनुसार, शशिकला आंबोळकर या १ जून २०२५ रोजी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास घरातून निघून गेल्या होत्या. त्यानंतर त्या परत न आल्याने कुटुंबीयांनी गावात आणि नातेवाईकांकडे त्यांचा शोध घेतला, परंतु त्या मिळून आल्या नाहीत. याबाबत नाटे पोलीस ठाण्यात नापत्ता क्रमांक ०५/२०२५ अन्वये तक्रारही दाखल करण्यात आली होती.

बुधवारी सकाळी फिर्यादीचे वडील प्रकाश आंबोळकर हे आत्याचा शोध घेण्यासाठी बाहेर पडले असता, त्यांना शशिकला आंबोळकर यांचा मृतदेह नाटे पडवणेवाडी येथील मुरकुंडा परिसरात एका कलमाच्या छोट्या खड्ड्यामध्ये मृतावस्थेत आढळून आला.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाची तपासणी केली असता, त्यांच्या मृत्यूचे कारण ‘कोरोनरी आर्टरी डिसीज’ (हृदयविकार) असल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणी नाटे पोलीस ठाण्यात आमृ. क्रमांक १५/२०२५ बी.एन.एस.एस १९४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:14 05-06-2025