हर्चे ग्रामपंचायत कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी: मारहाणीच्या घटनेनंतर प्रशासनावर प्रश्नचिन्ह

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात असलेल्या हर्चे गावात ग्रामपंचायत कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. ३० मे २०२५ रोजी हर्चे येथील ग्रामपंचायत कार्यालयात चंद्रकांत यशवंत नार्वेकर यांना झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर ही मागणी पुढे आली आहे. या घटनेत नार्वेकर यांना जबर मारहाण आणि शिवीगाळ करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे, या घटनेदरम्यान ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित असलेले सरकारी कर्मचारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक आणि इतर सदस्य व कर्मचाऱ्यांनी कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून पळ काढल्याचा आरोप करण्यात येत आहे.

या गंभीर प्रकारामुळे ग्रामपंचायत कार्यालयाच्या सुरक्षिततेवर आणि तेथील कर्मचाऱ्यांच्या जबाबदारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, ग्रामपंचायतीमध्ये होणाऱ्या संभाव्य भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी आणि भविष्यात अशा अनुचित घटना टाळण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा बसवणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे कार्यालयातील कामकाजावर अधिक पारदर्शकता येईल आणि गैरप्रकारांना आळा ब घालता येईल.

चंद्रकांत यशवंत नार्वेकर (रा. हर्चे, ता. लांजा, जि. रत्नागिरी) यांनी स्वतः या प्रकरणी जिल्हाधिकारी यांनी गांभीर्याने लक्ष घालून त्वरित दखल घ्यावी आणि सरकारी कार्यालयांमध्ये योग्य ती योजना राबवावी, अशी मागणी केली आहे. या घटनेमुळे हर्चे गावातील ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण असून, प्रशासनाने तातडीने यावर उपाययोजना करावी अशी त्यांची अपेक्षा आहे.

पुढील काळात जिल्हाधिकारी या मागणीवर काय भूमिका घेतात आणि हर्चे ग्रामपंचायत कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:00 05-06-2025