रत्नागिरीत ‘जागतिक पर्यावरण दिन’ उत्साहात साजरा: प्लास्टिकमुक्ती अभियान आणि वृक्षारोपण!

रत्नागिरी : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त (५ जून) गुरुवारी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत, झाडगाव, रत्नागिरी येथील ‘सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र’ येथे विविध कृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ‘प्लास्टिक प्रदूषण संपवू’ (End Plastic Pollution) या २०२५ च्या थीमवर आधारित या कार्यक्रमांमध्ये प्लास्टिक कचरा गोळा करणे, खारफुटीचे वृक्षारोपण आणि पर्यावरण शपथ असे उपक्रम राबवण्यात आले.

जगभरात पर्यावरणीय समस्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या पुढाकाराने ‘जागतिक पर्यावरण दिन’ साजरा केला जातो. १९७३ पासून सुरू झालेल्या या दिनात आता १४३ हून अधिक देशांचा सहभाग आहे.

शिरगाव खाडीत ‘प्लास्टिक प्रदूषण मुक्ती अभियान’

गुरुवारी सकाळी मत्स्य जलशास्त्र विभाग, राष्ट्रीय सेवा योजना, मत्स्य महाविद्यालय, शिरगाव आणि सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने शिरगाव खाडी (खारभूमी बंधाऱ्याजवळ) येथे ‘प्लास्टिक प्रदूषण मुक्ती अभियान’ राबवण्यात आले. या अभियानात खाडीतील प्लास्टिकयुक्त कचरा मोठ्या प्रमाणात गोळा करण्यात आला. यावेळी, पर्यावरणाच्या संरक्षणासाठी खारफुटीच्या रोपांचे वृक्षारोपणही करण्यात आले.

या उपक्रमात मत्स्य महाविद्यालयातील मत्स्य जलशास्त्र विभागाचे डॉ. आसिफ पागरकर, डॉ. अनिरुद्ध अडसूळ, तसेच एन.एन.एस. प्रमुख डॉ. संदेश पाटील, मत्स्य विस्तार शिक्षण विभागाचे डॉ. भावेश सावंत व डॉ. सुहास वासावे यांच्यासह मत्स्य महाविद्यालयातील विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला.

पेठकिल्ला येथील नवीन प्रकल्पाच्या ठिकाणी वृक्षारोपण आणि पर्यावरण शपथ

याच दिवशी सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरीच्या पेठकिल्ला येथील नवीन इमारत प्रकल्पाच्या बांधकाम प्रगतीपथावर असलेल्या ठिकाणीही विशेष वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. केंद्राचे प्रमुख व वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. आशिष मोहिते यांच्या उपस्थितीत पर्यटन स्थळाचा विचार करून ख्रिसमस ट्री, बदाम झाडे आणि शोभिवंत झाडांची लागवड करण्यात आली. यानंतर ‘सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी’ च्या सर्व अधिकारी आणि कर्मचारी वर्गाने पर्यावरणाच्या संरक्षणाची शपथ घेतली.

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोलीचे कुलगुरू डॉ. संजय भावे, संशोधन संचालक डॉ. पराग हळदणकर, आणि सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. आशिष मोहिते यांचे या कार्यक्रमांना विशेष मार्गदर्शन लाभले. डॉ. आसिफ पागारकर, डॉ. हरिष धमगये, प्रा. नरेंद्र चोगले, प्रा. सचिन साटम, श्रीम. व्ही. आर. सदावर्ते, श्री. रमेश सावर्डेकर यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:19 06-06-2025