चिपळूण : कळंबस्ते येथे आ. शेखर निकम यांच्या हस्ते वृक्षारोपण

चिपळूण : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील कळवंस्ते येथील पशुसंवर्धन विभागाच्या साडेतीन एकर पडीक जागेत देवराई उभारण्यासाठी सामुहिक श्रमदानातून वृक्षारोपण करण्यात आले.

येथे एकाच दिवसात १४९ विविध प्रजातीची १ हजार २५२ झाडे लावण्यात आली. सकाळी ७ वा. प्रांताधिकारी, तहसीलदार, यांच्यासह महसूल, कृषी विभाग आदी २०० हून अधिक शासकीय अधिकारी व कर्मचारी व नागरिकांनी देवराईच्या वृक्षलागवडीसाठी श्रमदान केले.

कळबंस्ते येथे उभारण्यात येत असलेल्या देवराईच्या वृक्ष लागवडीसाठी सकाळी सातच्या सुमारास महसूल, कृषी, सह्याद्री निसर्ग मित्र चे स्वयंसेवक व नागरिक जमले.

वृक्षलागवडीसाठी येथे नियोजनबद्ध आराखडा प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केला होता. लागवडीपूर्वी येथे चर खोदून ठिंबक सिंचनची व्यवस्था केली होती. तर झाडांना नियमीत पाणी देण्यासाठी बोअरवेलचीही व्यवस्था केली आहे. एका विभागात एकाच जातीच्या रोपांची लागवड करण्यात आली. सकाळी ७ वाजता सुरू झालेले वृक्षारोपण सायंकाळ पर्यंत सुरू होते. प्रांताधिकारी आकाश लिगाडे, तहसीलदार प्रविण लोकरे, तालुका कृषी अधिकारी शत्रुघ्न म्हेत्रे, उपविभागीय कृषी अधिकारी शिवाजी शिंदे, सर्व नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी यांच्यासह तालुक्यातील सर्व तलाठी, कोतवाल, कृषी सहायक, गुहागर तालुक्यातील महसूलचे अधिकाऱ्यांचा चमू वृक्षारोपणासाठी श्रमदान करत होते. हा संपूर्ण प्रकल्प लोकसहभागातून राबवण्यात येत आहे. याकामी प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी महत्वपूर्ण योगदान दिले आहे.

आमदार शेखर निकम यांनी या देवराईच्या वृक्षारोपण कार्यक्रमास भेट देत लोकसहभागातून राबवलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले. हा प्रकल्प आदर्शवत ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. आमदारांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

येथे मोकाट गुरांपासून झाडांना सरंक्षण मिळण्यासाठी तारेचे कंपाऊड घातले आहे. पुढील कालावधीत झाडांची माहिती देणारे फलक व अधिक माहितीसाठी त्याचा क्यूआर कोड दोन्ही झाडांच्या मध्यभागीच लावण्यात येणार आहे. जेणेकरून मुलांना विविध प्रकारच्या झाडांची माहिती मिळू शकेल. या प्रकल्पाची निगा राखणे, त्यांचे संगोपन करणे आदी विविध बाबींची जबाबदारी सह्याद्री निसर्ग मित्र या संस्थेवर सोपवली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:26 AM 06/Jun/2025