पावस : दीड तोळ्याचे सोन्याचे ब्रेसलेट रिक्षाचालकाकडून परत

पावस : पावस रिक्षा संघटनेतील सदस्य रिक्षाचालक नीलेश कृष्णा नयकर यांना रस्त्यात एक दीड तोळ्याचे सोन्याचे ब्रेसलेट सापडले. ते त्यांनी प्रामाणिकपणे संबंधितांना परत केले.

रत्नागिरी तालुक्यातील निरूळ-बौद्धवाडी येथील अनिश अर्जुन जाधव हे ३ जूनला कुटुंबासोबत येथे जवळ असलेल्या धबधब्याकडे फिरण्यासाठी गेले होते. सायंकाळी ते घरी परतत असताना त्यांच्या हातातील दीड तोळ्याचे सोन्याचे ब्रेसलेट त्याचा हूक तुटल्याने रस्त्यामध्ये पडले.

पाऊस भरपूर असल्यामुळे त्यांनी रस्त्यामध्ये शोधण्याचा प्रयत्न केला. पुन्हा सकाळी पाऊस सुरू असताना त्या ब्रेसलेटचा शोध घेतला; परंतु त्यांना ते सापडले नाही. दुसऱ्या दिवशी सायंकाळी पावस येथील नालेवठार भागात राहणारे रिक्षाचालक नयकर हे भाडे सोडून परत येत असताना रिंगीची वाडी बसस्टॉपजवळ रस्त्यामध्ये सोन्याचे ब्रेसलेट सापडले. त्यांनी याची माहिती त्या भागातील काही नागरिकांना दिली. बुधवारी (ता. ४) सायंकाळी याबाबत अनिश जाधव यांनी पावस येथील रिक्षाचालकांशी संपर्क साधला.

पावस रिक्षाचालक संघटनेचे अध्यक्ष पिंट्या शिंदे, उपाध्यक्ष दत्तात्रय साळुंखे, खजिनदार प्रसाद पवार यांनी या गोष्टीची खात्री करून सोन्याचे ब्रेसलेट अनिश जाधव यांना परत दिले. रिक्षाचालक नयकर यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले. या वेळी पूर्णगड सागरी पोलिस ठाण्याचे साहाय्यक पोलिस निरीक्षक रत्नदीप साळोखे, पोस्टमन अमोल जाधव, संदेश पालकर, पोलिस अंमलदार प्रकाश झोरे आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:39 AM 06/Jun/2025