Maharashtra Weather Update: राज्यात येत्या ३ दिवसात पावसाची शक्यता, ‘या’ ३० जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

मुंबई : काही दिवसांची विश्रांती घेतलेला मान्सून आता पुन्हा जोमात येण्याची शक्यता आहे. राज्यात येत्या तीन दिवसात पुन्हा वादळी वाऱ्यांसह, विजांच्या कडकडाटात पाऊस कोसळणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

तसेच मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगरसह तब्बल ३० पेक्षा अधिक जिल्ह्यांमध्ये ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यातील हवामान पुन्हा एकदा बदलण्याची चिन्हं आहेत. IMD ने दिलेल्या माहितीनुसार, येत्या तीन दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी वाऱ्यांसह, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.सध्या गुजरातच्या वरच्या भागात आणि बांगलादेशाच्या उत्तर भागात चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे हवामानात अस्थिरता असून, त्याचा थेट प्रभाव महाराष्ट्रावर पडतो आहे. अरबी समुद्र ते बंगालच्या उपसागरामधील मान्सूनचा प्रवाह सध्या स्थिरावलेला असून, पुढे सरकण्याची प्रतीक्षा सुरु आहे.

कोकण- मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी,मध्य महाराष्ट्र – पुणे (घाटमाथ्यासह), नाशिक, जळगाव, धुळे, सातारा, सांगली, सोलापूर, अहमदनगर, मराठवाडा -छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, हिंगोली, परभणी, धाराशिव, विदर्भ – नागपूर, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशिम, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा या जिह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला असून शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:31 06-06-2025