राजापूर : अणुस्कुरा घाटात ३ जून रोजी मध्यरात्री २ ते ४ जून रोजी सकाळी ८.३० च्या दरम्यान एका भीषण अपघातात कौस्तुभ विजय कुरूप (३०, रा. रत्नागिरी) या कारचालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांची मारुती सुझुकी एर्टिगा (क्र. एम.एच.०८/ए.एक्स-६१५५) कार घाटातील एका वळणावरुन थेट खोल दरीत कोसळली. या अपघात प्रकरणी निष्काळजीपणे वाहन चालवून स्वत:च्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कौस्तुभ याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ४ जून रोजी सकाळी सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी जयेश दिलीप फटकारे (२२), हे घाटातील आपले दुकान उघडण्यासाठी जात होते, त्यांना खोल दरीत एक राखाडी रंगाची मारुती सुझुकी एर्टिगा कार कोसळलेली दिसली. त्यांनी तातडीने याची माहिती राजापूर पोलिसांना दिली.
प्राथमिक तपासानुसार, चालक कौस्तुभ विजय कुरूप हे कोल्हापूरच्या दिशेकडून अणुस्कुरा घाटातून खाली उतरत असताना, घाटातील एका वळणावर हा अपघात घडला. त्यावेळी घाटात साधारण धुके आणि कमी प्रमाणात पाऊस होता. त्यामुळे चालकाला पुढील वळणाचा अंदाज आला नाही. याच निष्काळजीपणा आणि हलगर्जीपणामुळे त्यांचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी खोल दरीत कोसळून त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या प्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात कौस्तुभ याच्यावर भा.न्या.सं. कलम १०६ (१), १२५ (अ), १२५ (ब), २८१ आणि मो.वा.का.क. १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:14 06-06-2025














