चिपळूण : शहरातील बहादूरशेखनाका राधाकृष्णनगर येथे काही दिवसांपूर्वी चोरट्याने ९ सदनिका फोडून ऐवज पळवून नेला आहे, तसेच खंड भागात चोरीच्या घटना घडल्या आहेत. या चोरी प्रकरणाचा अजून उलगडा झाला नसून, लवकरच या चोरीचा पर्दाफाश व्हावा, अशी मागणी भाजपसह बहादूरशेखनाका राधाकृष्णनगरमधील रहिवाशांसह भाजपच्या शिष्टमंडळाने चिपळूण पोलिसांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
काही दिवसांपूर्वी चिपळूण बहादूरशेखनाका येथील राधाकृष्णनगरमध्ये नऊ सदनिका फोडीचा प्रकार घडला आहे. तसेच शर्मिला शिंदे यांच्याशी एकाने गोड बोलून हातातील सोन्याच्या पाटल्या काढून घेतल्या आहेत. खंड विभागात घरफोडी झाल्या आहेत. या चोऱ्यांचा अजून पर्दाफाश झालेला नाही. तरी लवकरच चोरट्यांना गजाआड करावे, अशी मागणी करताना पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी पोलिसांकडे केली आहे.
चिपळूण नगरपालिकेने सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, असे मुख्याधिकारी विशाल भोसले यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले. तसेच पावसाळा सुरू झाला असून, पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी व प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी आपल्या प्रभागातल्या समस्या मांडल्या. त्यावरती लवकरात लवकर उपाययोजना करण्यात येतील.
याचबरोबर चिंचनाका, बाजारपेठ आदी भागात वाहतूककोंडी होत असल्याने त्या दृष्टीने नियोजन करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या वेळी भाजप महिला आघाडी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष चित्रा चव्हाण, माजी नगराध्यक्ष सुरेखा खेराडे, माजी नगरसेवक परिमल भोसले, ज्येष्ठ पदाधिकारी विनोद सुर्वे, भाजप कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष विनोद कदम, शहर उपाध्यक्ष महेश कांबळी, विवेक गोखले आदी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:06 AM 06/Jun/2025














