रत्नागिरी : जिल्ह्याला मॉन्सूनपूर्व पावसाचा तडाखा बसला असून घरे, गोठे, बागायतीचे नुकसान झाले आहे. शाळांच्या इमारतीचीही पडझड झाली. जिल्हा परिषदेच्या १९ शाळा पावसामुळे बाधित झाल्या असून, १९ लाख ४४ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. गतवर्षी वादळी पावसामुळे वाधित झालेल्या शाळांची डागडुजी रखडलेली असतानाच आता मॉन्सूनपूर्व पावसानेही शाळांना तडाखा दिला आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये मॉन्सूनपूर्व पावसाचा जोरदार तडाखा जिल्ह्यातील अनेक गावांना बसला. सोसाट्याच्या वाऱ्यामध्ये शाळांच्या जुन्या इमारती, छतावरील पत्रे, कौले तसेच संरक्षक भिंती कोसळल्या किचनशेड, स्वच्छतागृहाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, रत्नागिरी आणि लांजा तालुक्यांतील ग्रामीण भागांमध्ये शाळांची कौले, पत्रे फुटली तर काही ठिकाणी कौले वाऱ्यामुळे उडून गेली. काही शाळांच्या इमारतींवर झाडांच्या फांद्या पडल्याने नुकसान झाले आहे. फुटलेल्या छपरातून आलेले पाणी इमारतींमध्ये साचून राहिल्याने चिखल निर्माण झाला आहे. उन्हाळी सुटीमुळे शालेय कामकाज बंद असल्यामुळे कुठेही अनुचित प्रकार घडला नाही; मात्र कौले फुटल्याने पावसाचे पाणी इमारतीमध्ये साचल्याने काही शाळांमधील पुस्तके आणि अन्य साहित्य भिजले आहे. त्यात शाळांचे १९ लाख ४४ हजारांचे नुकसान झाले आहे.
गतवर्षी पावसात दापोली, मंडणगड, गुहागर आणि अन्य तालुक्यांतील शाळांचे मोठे नुकसान झाले होते. त्या वेळी दुरुस्तीसाठी निधी अपुरा आला होता. यावर्षी मॉन्सूनपूर्व पावसामुळे नुकसानीची नव्याने भर पडली आहे. या पावसाने झालेल्या नुकसानग्रस्त शाळांच्या दुरुस्तीचा प्रश्न निर्माण होणार आहे. मॉन्सूनपूर्व मुसळधार पावासात शाळांचे नुकसान झाले असले तरी उन्हाळी सुटीमुळे अनर्थ टळला. अर्थात, लवकरच शाळा सुरू होत असल्याने अशा नादुरुस्त शाळांमधील विद्यार्थ्यांना शिकवणार तरी कसे, असा प्रश्न विद्यार्थी-पालकांमधून उपस्थित करण्यात येत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:13 AM 06/Jun/2025














