लांजा : शहरातील सेवारस्त्यावरील बेशिस्त पार्किंगमुळे वाहतूककोंडी होत असून, नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावर वाहने उभी करून वाहनचालक गायब होत असल्याने वारंवार वाहतूककोंडी होते.
मुंबई-गोवा महामार्गावरील लांजा शहरात एक लेनचा सेवारस्ता हा बसस्थानकापासून पुढे सुरू झाल्याने त्यावरून सतत वाहनांची वर्दळ असते; मात्र सेवारस्ता करायला विलंब झाल्याने लांजा बाजारपेठ विस्कळीत झाली आहे. सेवारस्ता झाल्याने वाहतूककोंडी कमी होईल, अशी अपेक्षा होती; परंतु बनवलेल्या सेवारस्त्यावर बेशिस्त पार्किंगमुळे पुन्हा वाहतूककोंडी होत आहे. सेवारस्त्यावरील बेकायदा
आणि वेड्यावाकड्या पार्किंगमुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. वाहने रोडवर उभी करून वाहनचालक बाजारपेठेत खरेदीसाठी फिरत असतात.
संबंधित वाहनचालकांना शोधून काढण्याची नामुष्की इतर वाहनचालक तसेच पादचाऱ्यांवर ओढवते. जोपर्यंत वाहनचालक येऊन आपले वाहन बाजूला करत नाही तोपर्यंत वाहतूककोंडी तशीच राहते. दरम्यान, वारंवार सूचना देऊनही सेवारस्त्यावर वाहने उभी केली जातात. अशा बेकायदेशीर आणि बेशिस्तपणे वाहने उभे करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
लांजा शहरात बेशिस्त पार्किंगला ऊत आला असून, लांजा पोलिसांनी वेळीच कारवाई करावी: अन्यथा आम्हाला शिवसेना स्टाईलने आंदोलन उभे करावे लागेल-सुरेश करंबळे, तालुकाप्रमुख, ठाकरे शिवसेना
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:25 AM 06/Jun/2025














