चिपळूणमध्ये सेवानिवृत्त व्यक्तीची ऑनलाइन फसवणूक; क्रेडिट कार्डच्या आमिषाने 6 लाख लंपास!

चिपळूण : चिपळूण येथील एका सेवानिवृत्त व्यक्तीला ऑनलाइन फसवणुकीचा फटका बसला असून, क्रेडिट कार्डच्या आमिषाने त्यांची तब्बल 6 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. 20 मार्च 2025 रोजी ही घटना घडली असून, 5 जून 2025 रोजी चिपळूण पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विजय हरी बापट (वय 72, रा. परांजपे स्कीम, एफ-2, बहादूरशेखनाका, चिपळूण) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. बापट यांना 19 मार्च 2025 रोजी फेसबुकवर ‘लाइफटाइम क्रेडिट कार्ड’ची एक जाहिरात दिसली. त्यांनी त्या जाहिरातीवर क्लिक करून फॉर्ममध्ये आपली माहिती भरली.

त्यानंतर 20 मार्च 2025 रोजी बापट यांना अनोळखी मोबाईल नंबर 74449688539 आणि 8818805230 वरून फोन आले. फोन करणाऱ्या अनोळखी व्यक्तींनी त्यांना क्रेडिट कार्ड पाहिजे आहे का, असे विचारले. बापट यांनी त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्यांना आपल्या एटीएम कार्डची सर्व माहिती दिली, तसेच गोपनीय पिन देखील सांगितला.

यानंतर, बापट यांच्या बँक खात्यातून पैसे काढले जात असल्याचे त्यांना बँकेच्या ॲपमध्ये दिसू लागले. खात्री केली असता, त्यांच्या आयडीबीआय बँकेच्या चिपळूण शाखेतील जॉइंट अकाउंट आणि सेव्हिंग अकाउंट तसेच एफडी मधून एकूण 6,00,000/- (सहा लाख रुपये) ऑनलाइन व्यवहार करून काढून घेतल्याचे निष्पन्न झाले.

याप्रकरणी चिपळूण पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता अधिनियम 2023 चे कलम 318(4) आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 66(क) नुसार गुन्हा दाखल केला आहे. अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. चिपळूण पोलिस या ऑनलाइन फसवणुकीचा अधिक तपास करत आहेत. नागरिकांनी अशा ऑनलाइन आमिषांना बळी न पडता सावधगिरी बाळगावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:24 06-06-2025