रत्नागिरी : शहराजवळील शिरगाव ग्रामपंचायतीकडून बांगलादेशात जन्म झालेल्या व्यक्तीला जन्मदाखला दिल्याचा मुद्दा उघड झाला होता. या प्रकरणी ग्रामविकास अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले होते. आता त्याची खातेनिहाय चौकशी सुरू करण्यात आली असून, जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागामार्फत आरोपपत्राची बजावणी झाली आहे.
बांगलादेशात जन्म झालेल्या एकाची जन्मतारीख १ मे १९८३ होती. त्याने शिरगाव ग्रामपंचायतीकडे जन्मदाखला मागितला. संबंधिताच्या मागणीनुसार, २०२० हा दाखला दिल्याचे मुंबई पोलिसांच्या तपासात आढळले. मूळ बांगलादेशी असलेल्या एका नागरिकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्याकडे रत्नागिरीतील जन्मदाखला असल्याची माहिती उघड झाली. मुंबई पोलिसांच्या पुढाकाराने आणखी तपास सुरू करण्यात आला.
त्या वेळी नजरचुकीने दाखला दिल्याची भूमिका घेण्यात आली. या साऱ्या प्रकाराची गंभीर दखल तत्कालीन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांनी घेतली. त्यानुसार ग्रामविकास अधिकारी वासुदेव सावके यांना निलंबित करण्याचे आदेश दिले.
बाळाच्या जन्मानंतर ३० दिवसांत ग्रामपंचायतीत जन्मनोंद करण्यात येते. त्यानंतर १ वर्षानंतर गटविकास अधिकाऱ्याच्या आदेशानंतर जन्मनोंद होते. त्यापेक्षा अधिक काळाची जन्मनोंद न्यायालयाच्या पूर्वपरवानगीने करण्यात येते. अशी कायदेशीर तरतूद असताना १ वषर्षापेक्षा जुन्या काळाची जन्मनोंद करून दाखला दिल्याचा आक्षेप घेण्यात आला होता. या प्रकरणी ग्रामविकास अधिकारी सावके यांची खातेनिहाय चौकशी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने सुरू केली आहे. दोषारोपपत्र तयार करून त्यावर खुलाशाची मागणी करण्यात आली आहे. रत्नागिरी पंचायत समितीमार्फत ही कारवाई सुरू करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:32 AM 06/Jun/2025














