पाली येथील युवकाला काठीने मारहाण, जीवे मारण्याची धमकी

रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील पाली येथे पूर्ववैमनस्यातून एका युवकाला काठीने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. ही घटना काल, 5 जून 2025 रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास पाली माईनवाडीकडे जाणाऱ्या तिठ्याजवळ घडली. या प्रकरणी काल रात्री 10 वाजून 8 मिनिटांनी रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुजय संतोष माईन (वय 34, रा. पाली माईनवाडी, ता. जि. रत्नागिरी) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. फिर्यादी सुजय माईन हे पाली बाजारपेठेतून आपल्या माईनवाडी येथील घरी पायी जात असताना, पाली माईनवाडीकडे जाणाऱ्या तिठ्यावर आरोपी रामचंद्र नायडू गराटे (रा. पाली गराटेवाडी, ता. जि. रत्नागिरी) याने त्यांना अडवले.

यावेळी आरोपी गराटे याने पूर्वीच्या वादातून सुजय माईन यांना काठीने मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. या मारहाणीत सुजय माईन जखमी झाले आहेत.

रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता अधिनियम 2023 च्या कलम 118(1) आणि 351(2) नुसार रामचंद्र नायडू गराटे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:24 06-06-2025