रत्नागिरी : रत्नागिरी शहरात अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. काल, 5 जून 2025 रोजी रात्री 9 वाजून 4 मिनिटांच्या सुमारास मिरकरवाडा येथील पांढरा समुद्रानजिक, पाण्याच्या टाकीच्या उत्तरेस 50 मीटर अंतरावर असलेल्या मोकळ्या मैदानातून 716 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात नेमणुकीस असलेले स.पो.फी. दीपक मनोहर साळवी (वय 53) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यांच्या माहितीनुसार, आरोपी रोहित राजेंद्र चव्हाण (वय 35, मूळ रा. घर ता. जि. रत्नागिरी, आंबेशेत) हा मिरकरवाडा येथील नमूद ठिकाणी विक्री करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीरपणे अंमली पदार्थ बाळगून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
पोलिसांनी घटनास्थळी धाड टाकली असता, आरोपी रोहित चव्हाण याच्या ताब्यातून 716 ग्रॅम वजनाचा, हिरवट-काळपट रंगाचा, पाने, फुले, बिया आणि काड्या असलेला गांजा सदृश्य अंमली पदार्थ एका प्लॅस्टिकच्या पिशवीत (पिशवीसह वजन 729 ग्रॅम) आढळून आला. या गांज्याची किंमत अंदाजे 30,000 रुपये आहे.
गांज्याव्यतिरिक्त, पोलिसांनी एक पांढऱ्या रंगाची पिशवी आणि एक पारदर्शक प्लॅस्टिकची पिशवी ज्यामध्ये एकूण 14 लहान व तीन मोठ्या अशा 17 रिकाम्या प्लॅस्टिकच्या पिशव्या होत्या, त्या जप्त केल्या आहेत. या रिकाम्या पिशव्या गांजा सदृश्य अंमली पदार्थ ठेवण्यासाठी वापरल्या जात असाव्यात असा पोलिसांना संशय आहे.
या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात काल रात्री 11 वाजून 54 मिनिटांनी एन.डी.पी.एस. अॅक्ट 1985 च्या कलम 8(क) आणि 20(ब) (ii) (अ) प्रमाणे गुन्हा (गु.र.नं. 238/2025) दाखल करण्यात आला आहे. आरोपी रोहित राजेंद्र चव्हाण याला अटक करण्यात आली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:44 06-06-2025














