हिंदुस्थान कोकोकोला कंपनीसमोर बेकायदेशीर जमाव, सरपंच आणि उपसरपंचांसह 22 जणांवर गुन्हा दाखल

खेड : खेड तालुक्यातील असगणी येथे हिंदुस्थान कोकोकोला ब्रेव्हरेज प्रा. लि. या कंपनीच्या बाहेर बेकायदेशीर जमाव जमवून जिल्हाधिकाऱ्यांच्या मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी असगणीच्या सरपंच संजना संजय बुरटे, उपसरपंच यासिन फरीक घारे, सदस्य प्रमोद पांडुरंग चांदिवडे, चंद्रकांत राजाराम गोसावी, सुविंद्र रामचंद्र घाडवे, शाहिन इस्माईल कादरी, रिया सचिन बाईत आणि मेघना भाऊ नायनाक यांच्यासह एकूण 22 जणांवर आणि सुमारे 400 ते 450 अज्ञात पुरुष व महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल, 5 जून 2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

खेड पोलीस ठाण्यांतर्गत लोटे पोलीस दूरक्षेत्रात नेमणुकीस असलेले पोकॉ विनायक भिकू येलकर यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, असगणी ग्रामपंचायत कार्यालय असगणी मोहल्ला येथून हिंदुस्थान कोकोकोला कंपनीच्या बाहेरील रस्त्यावरून कंपनीच्या मेनगेटसमोरील रस्त्यावर आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवला. या जमावाने जिल्हाधिकाऱ्यांच्या मनाई आदेशाचा आणि बजावलेल्या नोटीसचा भंग केला.

गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये इतर प्रमुख व्यक्तींमध्ये चेतन चंद्रकांत पवार, माजी उपसरपंच संजय सखाराम बुरटे, माजी सरपंच अनंत विठ्ठल नायनाक, शिवसेना शिंदे गटाचे शाखा प्रमुख इस्माईल हसन कादरी, माजी सरपंच हुसेन करीम ठाकुर, विवेक वासुदेव नायनाक, जावेद जब्बार आंबेडकर, रवींद्र सखाराम बुरटे, माजी सरपंच रवीना रवींद्र बाईत, श्रीकांत आत्माराम फडकले, संजय आंग्रे (आय.यू.एफ. संघटना सदस्य), उस्मान हसन इझगडे, दक्षता समिती अध्यक्ष गंगाराम धोंडू इप्ते आणि संजय तुळशीराम मोहिते यांचा समावेश आहे. खेड पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 189(2), 190, 223 आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:44 06-06-2025