गणेशोत्सवासाठी आरक्षित बसेस देण्याची मागणी

दापोली : गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांची तालुक्यातील खेडेगावात येण्यासाठी व परतीच्या प्रवासासाठी संगणकीय आरक्षणाद्वारे बसेस उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी रत्नागिरी विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांच्याकडे लोकनेते किशोर देसाई यांच्यामार्फत दापोली-मंडणगड प्रवासीमित्र संघटना व कोकण एसटीप्रेमी संघटनेने केली आहे.

तालुक्यामध्ये विविध गावांमध्ये मुंबई, ठाणे, नालासोपारा, बोरिवली, कल्याण, बदलापूर, पुणे अशा विविध ठिकाणांहून येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या गणेशोत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात असते. दापोली हा तालुका पूर्णपणे एसटी वाहतुकीवर अवलंबून असल्याने चाकरमानी जादा बसेससाठी संगणकीय आरक्षण आगाऊ स्वरूपात करतात.

गेली दोन वर्षे दापोली, मंडणगड तालुका प्रवासी संघटना आणि कोकण एसटीप्रेमी ग्रुप यांच्यावतीने दापोली आगाराच्या सौजन्याने चाकरमान्यांच्या परतीसाठी भडवळे मुंबई व बेजेवाडी मुंबई अशा बस उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या; मात्र गावाकडे येण्यासाठी बसेस उपलब्ध होत नाहीत.

त्यामुळे अशा प्रकारे बसेस उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. यामध्ये मुंबई-दापोली-कोळबांद्रे, ठाणे-दापोली-कोळबांद्रे, ठाणे-दापोली-भडवळे, मुंबई-दापोली-भडवळे, नालासोपारा-दापोली-भडवळे, मुंबई-दापोली-उंबरघर, ठाणे-दापोली-उंबरघर, बोरिवली-तिडे-मंडणगड, नालासोपारा-तिडे-मंडणगड, ठाणे-दापोली-उन्हवरे, नालासोपारा-दापोली-उन्हवरे, बोरिवली-दापोली-उन्हवरे, पुणे-वाकवली-भडवळे अशा फेऱ्यांचा समावेश असून, यासाठी लवकरच एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांजवळ पत्रव्यवहार करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेच्यावतीने देण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:47 AM 06/Jun/2025