11वी प्रवेश: येत्या रविवारी गुणवत्ता प्रवेश फेरी; १२.७ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी; मुदत संपुष्टात

मुंबई : अकरावीसाठीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची मुदत गुरूवारी संपली असून अखेरच्या दिवसापर्यंत राज्यातून १२ लाख ७१ हजार २९५ विद्यार्थ्यांनी यासाठी नोंदणी केली आहे.

यात मुंबईतील १,२१,६४५ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. आता सर्वसाधारण गुणवत्ता प्रवेश फेरी ८ जून रोजी होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना नोंदणी करताना तांत्रिक अडचणी आल्या आहेत, त्यांची नोंदणी पूर्ण करण्यासाठी शिक्षण विभाग प्रयत्नशील आहे. मात्र ९ ते ११ जून या कालावधीत हे प्रवेश पूर्ण करण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

शिक्षण विभागाच्या सॉफ्टवेअर प्रणालीतील तांत्रिक त्रुटींमुळे विद्यार्थ्यांना नोंदणी करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. हजारो विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसला. माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने ती समस्या दूर करण्याचा कसोशीने प्रयत्न केला. त्यातून ४ जून रात्री उशिरापर्यंत सर्व प्रलंबित ९०० तक्रारी सोडवण्यात आल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

राज्यामध्ये नोंदणी झालेल्यांपैकी १२ लाख १५ हजार १९० विद्यार्थ्यांनी नोंदणी शुल्क जमा केले आहे. तर अर्ज भाग एक पूर्ण भरून प्रवेश लॉक केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १२ लाख ५ हजार १६२ इतकी आहे. अर्ज भाग दोन पूर्ण भरून प्रवेश लॉक केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ११ लाख २९ हजार ९२४
इतकी आहे. नियमित फेरीसाठी ११ लाख २९ हजार ९३३ विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत.

प्रवेशाचे वेळापत्रक

  • ८ जून – सर्वसाधारण गुणवत्ता फेरी
  • ९ ते ११ जून – प्रत्यक्ष प्रवेश
  • १० जून – कॅप फेरी
  • ११ ते १८ जून – प्रत्यक्ष प्रवेश

कोटाअंतर्गत किती विद्यार्थ्यांनी सादर केले अर्ज?

  • इन हाऊस कोटा- ६४,२६८
  • अल्पसंख्याक कोटा- ४७,५७८
  • व्यवस्थापन कोटा- ३२,७२१

मुंबई विभागातील नोंदणी

  • १,२१,६४५ – एकूण नोंदणी
  • १,१८,५६० – शुल्क भरणा पूर्ण
  • १,१७,५०७ – प्रवेश भाग १ लॉक
  • १,०७,४७० – प्रवेश भाग २ लॉक

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:06 06-06-2025