गुहागर : अडूर येथे १९७८-७९ मधील पहिलीच्या वर्गाचा स्नेहमेळावा उत्साहात

गुहागर : तालुक्यातील अडूर येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श केंद्रीय शाळा अडूर नं. १ या शाळेतील १९७८-७९ च्या पहिलीच्या वर्गाचे पहिले स्नेहसंमेलन नुकतेच उत्साहात पार पडले. ४८ वर्षांनंतर एकमेकांशी पुन्हा संपर्क साधत हे माजी विद्यार्थी एकत्र आले.

शाळेतील दिवस, वर्गातील खोडकर किस्से, शिक्षकांची शिस्त, अभ्यासाचे क्षण आणि बालपणीचा साधेपणा हे सगळं आठवत पुन्हा त्या शाळकरी वयात हरवलेले चेहरे हास्य आणि अश्रूमध्ये दिसत होते. काहीजण तर ४८ वर्षांनंतर प्रथमच एकमेकांना भेटले. कार्यक्रमाची सुरुवात परेडने झाली. प्रत्येकाने आपला आयुष्याचा प्रवास, व्यवसाय, अनुभव सांगताना जुन्या आठवणी शेअर केल्या. – काहींनी कविता, गाणी आणि किस्स्यांनी कार्यक्रमात रंगत आणली. या वेळी काही दिवंगत शिक्षक व वर्गमित्रांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाने पुन्हा एकदा त्या निरागस शाळकरी मैत्रीला नवसंजीवनी दिली गेली.

या गेट-टुगेदरसाठी अडूर गावच्या सरपंच शैलजा गुरव, उपसरपंच उमेश आरस, मुख्याध्यापिका गुरव, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष प्रदीप झगडे व इतर सदस्य उपस्थित होते. माजी विद्यार्थ्यांमध्ये नारायण झगडे, अरूण पवार, दीपक साळवी, रमेश आंबेकर, महेंद्र झगडे, चंद्रशेखर निंबरे, परेश पटेल, सुरेश देवळे, उदय माटल, विद्याधर जाधव, उदय कानडे, भारती झिंबर, कुंदा शिंदे, सविता पाटील, वंदना माटल, लीला घाणेकर, फिरोज मयेकर यांच्यासह अनेकजण सहभागी झाले होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:55 AM 06/Jun/2025