संगमेश्वर तालुक्यात ३५ पूरसदृश, ३० दरडप्रवण भाग

संगमेश्वर : पावसाळ्यात येणाऱ्या आपत्तीवर मात करण्याच्यादृष्टीने प्रशासन सज्ज झाले आहे. संगमेश्वर तालुक्यात नदीकिनारी असलेले २१ आणि खाडीजवळील १४ सखल भागात पुराचे पाणी भरण्याचा धोका आहे. तसेच ३० गावात दरड कोसळणे किंवा भूस्खलनाची शक्यता आहे. त्यानुसार तेथील लोकांना सतर्कतेच्या सूचना तहसील प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

संगमेश्वर तालुक्यात आगामी मॉन्सून २०२५च्या अनुषंगाने सर्व शासकीय विभागात आपत्ती व्यवस्थापन तयारी पूर्ण झाली असून, आपत्कालीन परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी सज्ज झाली असल्याचे तहसील कार्यालयाने जारी केलेल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे. संगमेश्वर तालुक्यात नैसर्गिक आपत्तीपूर्व आढावा बैठक घेण्यात आलो. या बैठकीत मॉन्सूनच्या अनुषंगाने प्रत्येक शासकीय विभागांनी पूर्वतयारीची कामे पूर्ण करून आपत्ती व्यवस्थापनासाठी सज्ज राहण्याच्या देण्यात आलेल्या सूचनेनुसार, त्या विभागाचे आपत्ती व्यवस्थापन आराखडे तसेच ग्रामपंचायत पातळीवर गाव आपत्ती व्यवस्थापन आराखडे अद्ययावत करण्यात आले आहेत. तहसील कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन नियंत्रणकक्ष २४ तास कार्यरत करण्यात आला आहे.

पूर्वानुभवानुसार पाणी भरणे, भूस्खलन, दरड कोसळणे, नदीच्या पुराचे वा धरणामधील पाणी सोडल्यामुळे पाणी भरण्याची शक्यता असलेले, दरडग्रस्त, भूस्खलन वा अन्य आपत्तीची शक्यता असलेले किंवा प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात घडलेल्या आपत्ती विचारात घेऊन मंडळनिहाय गावांचा तपशील तयार करण्यात आला आहे, त्यानुसार ५५ ग्रामपंचायतींमधील ६४ गावांतील नदीलगतची २१ आणि खाडीलगतच्या १४ सखल भागांमध्ये पाणी भरण्याचा धोका आहे. तसेच ३० गावांत दरड कोसळणे वा भूस्खलनाची शक्यता आहे. मॉन्सून कालावधीत तसेच आपत्ती कालावधीत संपर्कासाठी पूर्वतयारी व मदतकार्याच्या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग, गडगडी नदी प्रकल्प उपविभागासारख्या शासकीय विभागांमधील कनिष्ठ अभियंता तत्सम अधिकारी, संबंधित मंडळ अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, ग्राममहसूल अधिकारी, गावचे पोलिस पाटील यांची आपत्ती व्यवस्थापन साहाय्य पथके नियुक्त केली आहेत. देवरूख मुख्याधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापन कृती आराखडा, अग्नीशामक, लाईफबोये, लाईफजॅकेट यासारखी साधने सज्ज ठेवलेली आहेत. प्रत्येक ग्रामपंचायतीत आपत्ती व्यवस्थापन कृती आराखड्यासह गावपातळीवरील शासकीय विभागाचे कर्मचारी यांची गाव आपत्ती व्यवस्थापन पथके सज्ज आहेत.

महामार्गावर जेसीबी, पोकलेन सज्ज
तालुक्यातील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग आणि रत्नागिरी-कोल्हापूरची मॉन्सून आपत्ती व्यवस्थापनअंतर्गत २० व २७ मे रोजी राष्ट्रीय महामार्गाची महसूल विभाग, पोलिस विभाग, राष्ट्रीय महामार्ग विभाग, संबंधित ठेकेदार यांच्यासमवेत संयुक्त पाहणी करण्यात आली. राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या माध्यमातून आवश्यक उपाययोजना केल्या आहेत. राष्ट्रीय महामार्गाच्या मध्यवर्ती ठिकाणी जेसीबी, पोकलेन आदी साधनांची व्यवस्था करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:02 PM 06/Jun/2025