रत्नागिरी : सासरी होणाऱ्या छळाच्या ४२ तक्रारी दाखल

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात सुनांचा छळांचे प्रमाण कमी असले तरी तो सुरू असल्याचे पुढे आले आहे. जिल्हा पोलिसदलाच्या महिलाकक्षामध्ये सासरच्या लोकांकडून छळ होणाऱ्या एक-दोन नव्हे तर ४२ तक्रारी गेल्या चार महिन्यांत दाखल झाल्या आहेत. ही बाब चिंताजनक आहे. दोन प्रकरणात गुन्हा दाखल झाला असून, २१ प्रकरणांमध्ये भरोसाकक्षाने सासरच्या लोकांचे समुपदेशन करून विवाहितेला न्याय मिळवून दिला आहे.

पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, आदी जिल्ह्यांमध्ये हुंड्यांसाठी अजूनही विवाहितेचा छळ होत असल्याची अनेक उदाहरणं आहेत. त्या तुलनेत रत्नागिरी जिल्ह्यात हुंड्यासाठी विवाहितेचा छळ केल्याचे प्रकार कमी आहेत; परंतु थोड्या प्रमाणात का होईना सुरू आहेत. हुंड्याच्या स्वरुपात गाडी, बंगला, सोने, पैसे आदींसाठी सुनांचा अतिशय खालच्या पातळीला जाऊन छळ केला जातो; पुणे येथील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण सध्या ताजे आहे. या घटनेनंतर जिल्हा पोलिसदलाच्या महिलाकक्षाकडून मिळालेली आकडेवारीदेखील चिंताजनक आहे. महिलाकक्षामध्ये गेल्या चार महिन्यांमध्ये दाखल झालेल्या तक्रारीमध्ये सासरच्या लोकांकडून होणाऱ्या छळाच्या ४२ तक्रारी दाखल आहेत.

सासरच्या मंडळींकडून कोणत्या ना कोणत्या कारणावरून सुनेचा छळ केला जात आहे. विवाहितेला संसार टिकवायचा असतो; परंतु सासरच्या लोकांकडून होणाऱ्या छळामुळे अनेक संसार उद्ध्वस्त झाले आहेत; परंतु मोठ्या विश्वासाने पोलिस भरोसाकक्षात तक्रार घेऊन येणाऱ्या महिलांना दलाकडून धीर देऊन त्यांचा छळ थांबवण्यासाठी प्रयत्न केले जातात. जानेवारी ते एप्रिल २०२५ या चार महिन्यांमध्ये येथील भरोसा कक्षात कौटुंबिक छळाच्या ४२ तक्रारी दाखल करण्यात आल्या. यापैकी २ प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल झाले तर तब्बल २१ प्रकरणांमध्ये भरोसाकक्षाने सासरच्या लोकांचे समुपदेशन करून विवाहितेला न्याय मिळवून दिला.

भरोसाकक्षांचा आधार
रत्नागिरीतील पोलिस मुख्यालयात असलेल्या भरोसाकक्ष किंवा विशेष महिलाकक्षात पीडित महिलेची समस्या ऐकून घेतली जाते. त्याबाबत शहानिशा करून सासरच्या लोकांना समजावून सांगितले जाते; मात्र त्या महिलेला मारहाण करून त्रास दिल्यास सासरच्या लोकांवर गुन्हा दाखल होतो. अडचणीच्या काळात पीडित महिलांना भरोसा कक्षावरच सर्वांत जास्त भरोसा असतो.

तक्रार देण्यास टाळाटाळ
बरेचदा सासरी छळ होत असूनही ती महिला आपल्या माहेरच्या मंडळीना जास नको किंवा माहेरच्या नावाला बट्टा लागू नये तर काहीवेळा सासरच्या दडपणामुळे तक्रार करायला धजावत नाहीत. त्यामुळे या महिला कायम छळ सहन करत राहतात. अशी प्रकरणे बाहेर येत नाहीत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:25 PM 06/Jun/2025