अलोरे शिरगाव : चिपळूण तालुक्यातील राजवाडा तिवरे येथे एका अवघ्या दोन महिने 26 दिवसांच्या चिमुकल्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना काल, 5 जून 2025 रोजी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास घडली. प्राथमिक आरोग्य केंद्रात आणल्यानंतर डॉक्टरांनी बाळाला मृत घोषित केले.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मृत बालिकेचे नाव अक्षता मनोज पवार (वय 2 महिने 26 दिवस, रा. राजवाडा तिवरे, ता. चिपळूण) असे आहे. काल पहाटे 3 वाजल्यापासून अक्षताची कोणत्याही प्रकारची हालचाल होत नव्हती आणि तिच्या नाकातून दूध बाहेर आले होते, अशी माहिती समोर आली आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र, दादर येथील आशा कार्यकर्तीने अक्षताला डोस देण्यासाठी तिच्या घरी फोन करून विचारणा केली, तेव्हा ही बाब समोर आली. त्यानंतर, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या गाडीने अक्षताला तातडीने दादर प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. परंतु, तेथील डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर अक्षताला मृत घोषित केले.
अलोरे शिरगाव पोलिस ठाण्यात या घटनेची आमू. क्रमांक 13/2025 बी.एन.एस.एस 194 प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. ‘एस्पिरेशन न्यूमोनिया’ (Aspiration Pneumonia) हे मृत्यूचे कारण असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:43 06-06-2025














