रत्नागिरी : “आमचा धर्म खाकी हाच आहे. त्यामुळे सर्वांना बरोबर घेऊन जाताना एकोप्यासाठी प्रसंगी कठोर होऊन कर्तव्य बजावू,” असे प्रतिपादन रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यांतर्गत आयोजित सामाजिक सलोखा समितीच्या परिचय बैठकीत केले. पोलीस अधीक्षक बगाटे यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात प्रत्येक पोलिस स्थानकांतर्गत सामाजिक सलोखा समित्या स्थापन करण्यात येत आहेत.
रत्नागिरी शहर पोलिस स्थानकांतर्गत समितीच्या सदस्यांची येथील दैवज्ञ भवन येथे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक शिवप्रसाद पारवे, रत्नागिरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर आणि शहर पोलीस निरीक्षक सतीश शिवरकर उपस्थित होते.
शांतताप्रिय कोकणासाठी पोलिसांचा प्रयत्न
बैठकीच्या सुरुवातीला जयदीप परांजपे यांनी पोलीस अधीक्षक बगाटे यांचा परिचय करून दिला. आपल्या मनोगतात बगाटे म्हणाले की, कोकणातील लोक प्रगल्भ आणि शांतताप्रिय आहेत. त्यामुळे येथे बळाचा वापर करण्याची गरजच नाही. अशा शांततापूर्ण भागाला शांत ठेवण्यासाठी पोलीस दल नेहमीच प्रयत्नशील राहील. पोलिस आणि समाज यांच्यातील दरी कमी व्हावी या उद्देशानेच सामाजिक सलोखा समित्या स्थापन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
सोशल मीडियावरील आव्हानांना सामोरे जाणार
सध्या सोशल मीडियावरून समाजातील एकोप्याला धोका पोहोचवणारे अनेक प्रकार घडत आहेत. मात्र, खाकीचा धर्म पाळून, प्रसंगी कठोर होऊन कर्तव्य करू, असेही बगाटे यांनी या वेळी स्पष्ट केले. अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी सामाजिक सलोखा राखण्यासाठी नागरिकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे नमूद केले.
या बैठकीचे सूत्रसंचालन पूर्व पेठे यांनी केले, तर उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी पोलीस पाटील, रत्नागिरी तालुक्यातील नागरिक, पत्रकार मोठ्या संखेने उपस्थित होते. ही समिती रत्नागिरीतील सामाजिक सलोखा अधिक दृढ करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल अशी अपेक्षा आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:47 06-06-2025














