चिपळूण : कर्करोग शिबिरात आढळले ३४ संशयित रुग्ण

चिपळूण : आत्याधुनिक कर्करोग निदान व्हॅनद्वारे नुकतीच कामथे, सावर्डे, खेर्डी, रामपूर येथील ५६४ संशयितांची कर्करोग तपासणी करण्यात आली. यामध्ये ३४ संशयित रुग्ण आढळले आहेत. आरोग्य सेवा बळकटीकरणासाठी व कर्करोगाचे लवकर निदान होऊन उपचार सुलभ करण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाने ही तपासणी मोहीम हाती घेतली होती. मे. मेडिऑन हेल्थकेअर यांच्याकडून कोल्हापूर परिमंडळ अंतर्गत कर्करोग व्हॅन प्राप्त झाल्याने त्याद्वारे तपासणी करण्यात आली.

या मोहिमेचा शुभारंभ कामथे उपजिल्हा रुग्णालयात आमदार शेखर निकम यांच्याहस्ते करण्यात आला. त्यानंतर वरील चार ठिकाणी ५६४ संशयितांची तपासणी करण्यात आली असता त्यात तोंडाच्या कर्करोगाचे ११, गर्भाशय मुखाचे २१ व स्तनाच्या कर्करोगाचे २ संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यांचे नमुने पुढील तपासणीसाठी पाठवले असून त्याचा अहवाल आल्यावर पुढील औषधोपचार सुरू करण्यात येणार आहेत.

रुग्णांची तपासणी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, सिव्हिल सर्जन डॉ. भास्कर जगताप, कामथेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय कांबळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती यादव यांच्या मार्गदर्शनाखाली कामथे उपजिल्हा रुग्णालयातील स्त्री रोग तज्ञ डॉ. कांचन मदार, दंतशल्य चिकित्सक डॉ. सतीश गवळे, डेरवण रुग्णालयाच्या डॉ. आसावरी मोडक यांनी केली. त्यांना सर्व वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहाय्यक, सहाय्यिका, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवक, सेविका, आशा सेविका यांचे सहकार्य लाभले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:02 PM 06/Jun/2025