रत्नागिरीत जिल्हा अजिंक्यपद ॲथलेटिक्स स्पर्धा: राज्य निवड चाचणीसाठी सुवर्णसंधी!

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनतर्फे पुरुष व महिला जिल्हा अजिंक्यपद आणि राज्य निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा शुक्रवार, १३ जून २०२५ रोजी श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्ट, डेरवण, चिपळूण येथे होणार असून, जिल्ह्यातील उदयोन्मुख खेळाडूंना आपले कौशल्य दाखवण्यासाठी आणि राज्यस्तरीय स्पर्धेत स्थान मिळवण्यासाठी ही एक उत्तम संधी आहे.

ही स्पर्धा दिनांक २१ ते २३ जून २०२५ दरम्यान शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे येथे होणाऱ्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी जिल्हा संघाची निवड करण्यासाठी आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत १८ वर्षांवरील म्हणजे २८ ऑगस्ट २००५ पूर्वी जन्मलेले खेळाडूच पात्र ठरतील. राज्य स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खेळाडूंकडे यूआयडी (UID) नंबर असणे आवश्यक आहे.

डेरवण क्रीडा संकुल येथे शुक्रवार, १३ जून रोजी सकाळी ९.०० वाजता स्पर्धेला सुरुवात होईल. सर्व सहभागी खेळाडूंनी सकाळी ८.०० वाजेपर्यंत आपली उपस्थिती नोंदवणे अनिवार्य आहे. त्यापूर्वी, संघटनेच्या गुगल फॉर्मवर आपला प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे. स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क १०० रुपये ठेवण्यात आले आहे. प्रवेशिका नोंदवण्याची अंतिम तारीख १० जून आहे. यानंतर प्रवेश घेणाऱ्या खेळाडूंना १५० रुपये प्रवेश फी भरावी लागेल.

या स्पर्धेत पुरुष व महिला गटातील खेळाडूंना विविध क्रीडा प्रकारात सहभागी होता येणार आहे. यामध्ये १०० मी., २०० मी., ४०० मी., ८०० मी., १५०० मी., ५००० मी., १०००० मी. धावणे, ११० मी. हर्डल्स, ४०० मी. हर्डल्स, ३००० मी. स्टीपलचेस, उंच उडी, लांब उडी, गोळाफेक, थाळीफेक, भालाफेक, हातोडाफेक, डेकॅथलॉन आणि हेप्टॅथलॉन या खेळांचा समावेश आहे. प्रत्येक खेळाडूला किमान दोन क्रीडा प्रकारात सहभागी होता येईल.

अधिक माहिती आणि मार्गदर्शनासाठी रत्नागिरी जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनने अविनाश पवार (८२७५६३५५३३) आणि अजहर खलपे (९९६०६६६९७९) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. जिल्ह्यातील सर्व पात्र खेळाडूंनी या संधीचा लाभ घेऊन आपली सर्वोत्तम कामगिरी करावी आणि जिल्ह्याचे नाव उज्वल करावे, असे असोसिएशनने म्हटले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:22 06-06-2025