Breaking : गोवंश वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त!

◼️ रत्नागिरी ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई

रत्नागिरी : गोवंश वाहतूक आणि कत्तलीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने कंबर कसली असून, याच मोहिमेअंतर्गत रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. काल रात्री मुंबई-गोवा महामार्गावर एका संशयित टेम्पोतून बेकायदेशीरपणे गोवंश वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती. जयश्री गायकवाड यांनी गोवंश वाहतूक व कत्तल प्रतिबंधाबाबत सर्व पोलीस ठाण्यांना कठोर कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. याच सूचनांनुसार, ५ जून २०२५ रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने मुंबई-गोवा महामार्गावरील खानू पेट्रोल पंपाजवळ नियमित गस्त घालत असताना एका संशयित टाटा ४०७ टेम्पो (क्र. एम.एच-१४-एच.यु-५४०६) ला थांबवले.

टेंपोच्या हौद्याची तपासणी केली असता, त्यात पाच बैल अत्यंत क्रूरपणे जवळजवळ बांधलेले आढळले. त्यांची योग्य वैद्यकीय तपासणी केलेली नव्हती आणि त्यांना कोणतेही खाद्य व पाण्याची व्यवस्था करण्यात आली नव्हती. केवळ कत्तलीसाठी त्यांना वेदनादायी अवस्थेत घेऊन जात असल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांनी टेम्पोवरील चालक राहुल आनंदा सावंत (वय २३, रा. बोरपाडळे, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) आणि ऋषिकेश आनंदा सावंत (वय २६, रा. बोरपाडळे, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे बैलांच्या खरेदीची कोणतीही कायदेशीर पावती नव्हती.

या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. १०८/२०२५ नुसार प्राणी छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० चे कलम ११ (१) (अ) (ड) (ई) (फ) (एच), महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९७६ चे कलम ५ (अ) (ब), ९, महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ११९, आणि केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ चे कलम १२५ (ई) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईत पोलिसांनी ६ लाख रुपये किमतीचा टाटा ४०७ टेम्पो (एम.एच-१४-एच.यु-५४०६) आणि ३८,००० रुपये किमतीचे ५ गोवंश बैल असा एकूण ६ लाख ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या ५ बैलांची सुटका करण्यात आली असून, त्यांना योग्य ठिकाणी पाठवण्यात येणार आहे.

ही यशस्वी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती. जयश्री गायकवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी, रत्नागिरी श्री. नीलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र यादव, पो.उ.नि. श्री. चव्हाण, सपोफौ/११२९ श्री. सावंत, सपोफौ/२५३ श्री. कांबळे, मपोहवा/१२७४ श्रीमती. सावंतदेसाई आणि पोशि/१४२ श्री. पाटील यांच्या पथकाने केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात यापुढेही अशा प्रकारच्या अवैध वाहतुकीवर कठोर कारवाई सुरूच राहील, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:39 06-06-2025