पाचल : पर्यावरणाचा ढासळता समतोल साधण्यासाठी वृक्षारोपण हा त्यावरील उपाय आहे. वृक्षारोपणाबरोबरच लावलेल्या वृक्षांचे जतन केल्यास जागतिक पर्यावरण दिनाच्या कार्यक्रमाचे औचित्य सफल होईल, म्हणूनच आपण वृक्षारोपण, जतन, संवर्धन ही त्रिसूत्री हाती घेऊन काम करूया, असे आवाहन संस्थेचे सरचिटणीस नरेश पाचलकर यांनी केले.
राजापूर तालुक्यातील पाचल येथील श्री मनोहर हरी खापणे महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग आयोजित जागतिक पर्यावरण दिन वृक्षारोपण कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, माणसाच्या चुकीच्या वर्तनामुळे आज पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे. औद्योगिकीकरणाच्या रेट्यात प्रचंड प्रमाणात माणसाकडून प्रदूषण होत आहे.
वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होत असून, जमिनीची धूप मोठ्या प्रमाणात होत आहे. पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे. हा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपणाबरोबरच वृक्षसंवर्धन महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. विकास पाटील, डॉ. ए. डी. पाटील, प्रा. एस. व्ही. निंबाळकर, डॉ. बी. टी. दाभाडे, प्रा. एन. जी. देवन, ग्रंथपाल डॉ. एम. आर. कोंडागुर्ले, राजेश चव्हाण, संदीप सक्रे, स्नेहा कोलते, भगवान जाधव, गुलाब मदगे, संतोष पालकर, मधुकर साटम उपस्थित होते.
संस्थेचे सरचिटणीस नरेश पाचलकर यांच्या हस्ते आंबा वृक्षाची लागवड करण्यात आली. यावेळी आंबा, शेवगा, जांभूळ अशा विविध रोपांची लागवड करण्यात आली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:43 PM 06/Jun/2025














