खेड : शहरानजीकच्या जगबुडी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात आहे. गेले काही वर्षांत नदीपात्रात मगर मृतावस्थेत आढळल्या आहेत. एका बाजूला दोन कोटींचा निधी वापरून नदीतील गाळ काढला जात असताना दुसरीकडे कचरा टाकून प्रदूषण केले जात असल्याने पर्यावरण प्रेमींकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
जगबुडी नदी किनाऱ्यावरील भोस्ते, वेरळ, भरणे ग्रामपंचायत व नगरपालिका क्षेत्रातील नागरिक नदी किनारी व पात्रात कचरा टाकत असल्याचे दिसत आहे. गेल्या काही महिन्यांपासून नदीपात्रात
शहरालगतच्या भागात मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात असल्याची बाब निदर्शनास येत असून या प्रकरणी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रम महामंडळाने तत्काळ लक्ष देऊन प्रदुषण रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्याची मागणी पर्यावरणप्रेमींकडून होत आहे.
जगबुडी नदी पात्रात शहराजवळील सखल भागात नैसर्गिक गाळ साचल्याने तो पूर येण्यास कारणीभूत ठरत असल्याने तो गाळ काढण्यासाठी सरकार कडून सुमारे दोन कोटींच्या पेक्षा जास्त रक्कम खर्च करून प्रयत्न सुरू आहे. मे २०२५ अखेर पर्यंत ३५ हजार घन मीटर गाळ काढण्यात आला आहे. परंतु एका बाजूला गाळ काढून नदीपात्र मोकळे केले जात असताना या ठिकाणापासून दोन किलोमीटरच्या अंतरावर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या जगबुडी पुलाखालील भागात कचऱ्याचा ढीग वाढताना दिसत आहे.
जिल्हा प्रशासन जगबुडी नदीतील प्रदूषण थांबवण्यात पूर्णतः अपयशी ठरले असल्याने गेल्या कित्येक वर्षांपासून नदी किनारी कचरा टाकण्याचा घातक प्रकार सुरू आहे. काही समाजकंटक नदीपात्रातच कचरा टाकताना आढळून आले आहेत. पालिका क्षेत्रा सोबतच नदी किनाऱ्यावर वसलेली भरणे, वेरळ, भोस्ते या गावांतून देखील नदी पात्रात कचरा टाकला जात असल्याने गेल्या काही वर्षांमध्ये नदीला गटाराचे स्वरूप प्राप्त होऊ लागले आहे.
जगबुडी नदीपात्र अनेक
जलचरांचे घर असून सुमारे सहा फूट लांबीच्या महाकाय मगरी या नदीत आहेत. मात्र गेल्या काही वर्षांत मगरींचे मृत्यू नागरिकांकडून नदीत टाकण्यात येणाऱ्या कचऱ्या मुळे होत असल्याची चर्चा आहे. एका बाजूला राज्य सरकार जगबुडी नदी पुनरूज्जीवन कार्यक्रमांतर्गत कोट्यवधी रूपये खर्च करत असतानाच शहर व परिसरातील गावांतून नदीपात्रात होत असलेले प्रदुषण रोखण्यासाठी मात्र कोणत्याच उपाययोजना होताना दिसत नाही ही खंत व्यक्त केली जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:30 PM 06/Jun/2025














