मंडणगड : शेतकऱ्यांची पेरणीसाठी धावपळ

मंडणगड : पावसाची थोडी उघडीप मिळताच नांगर घेऊन पेरणी करण्यासाठी शेतकरी शेताकडे धाव घेत आहेत.

संततधार कायम राहिली असून, धूळवाफेसाठी आवश्यक असणारे ऊन आता शक्य नसल्याने शेतकऱ्यांना आता चिखलपेरणी करावी लागणार असल्याचे चित्र आहे. परिणामी, उत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मे आणि जूनमध्ये सुमारे ५०० मिमी पाऊस पडला आहे. मे महिन्यातच पावसाने जोरदार हजेरी लावल्याने यावर्षीच्या खरीप हंगामातील कामाचे नियोजन बिघडून गेले.

रोहिणी नक्षत्राच्या पार्श्वभूमीवर येथील शेतकरी पेरणी करत आला आहे; मात्र बदललेल्या वातावरणामुळे या वेळी त्याला हा मुहूर्त साधता आला नाही. कृषी विभागाकडून आधी पेरणी करू नये, असे सांगण्यात आले; मात्र पाऊस उघडीप देत नसल्याने यानंतर पेरणी कधी करायची, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. पेरणीनंतर बेर, फोड आणि चिखलणी असे नियोजन असते. पेरणीच नसल्याने पुढील कामे खोळंबून गेली आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:25 AM 07/Jun/2025