लांजा येथे एस.टी. बसच्या धडकेत पादचारी जखमी; चालक विरोधात गुन्हा दाखल

लांजा : मुंबई-गोवा महामार्गावर, लांजा येथील एस.टी. स्टँडसमोर ३१ मे २०२५ रोजी दुपारी १२.३० वाजता एक भीषण अपघात घडला. रत्नागिरी ते कणकवली अशी धावणाऱ्या एस.टी. बसने (एमएच-१४ बीटी-२५०७) एका पादचाऱ्याला धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात बसचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेची फिर्याद लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र अर्जुन कांबळे (पो.हे.कॉ/११९८) यांनी दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, एस.टी. बसचा चालक अविनाश अशोक हारे (वय ३९, रा. एस.टी. डेपो कणकवली, जि. सिंधुदुर्ग, मूळ रा. बौद्धवाडी, ता. चिपळूण मिरजोळी) हा रत्नागिरीहून कणकवलीकडे बस घेऊन जात होता. लांजा एस.टी. स्टँडमध्ये बस वळवताना, चालकाने रस्त्याची परिस्थिती लक्षात न घेता, अत्यंत हयगयीने आणि निष्काळजीपणे बस चालवली.

या निष्काळजीपणामुळे बसने पादचारी महादेव गुणाजी कुळये (वय ६८, रा. शिरवली, पलीकडचीवाडी, ता. लांजा, जि. रत्नागिरी) यांना जोरदार धडक दिली. या अपघातात महादेव कुळये यांना लहान-मोठ्या दुखापती झाल्या आहेत.

लांजा पोलिसांनी ६ जून २०२५ रोजी सायंकाळी ४.०१ वाजता भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम २८१, १२५ (अ), १२५ (ब) आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ नुसार गुन्हा क्रमांक ११५/२०२५ दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास लांजा पोलीस करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:00 07-06-2025